

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर येथे अमृतकुटीवर झालेल्या बैठकीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठा खुलासा केला.
ही बैठक आपल्याकडे व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्यानुसार बैठक झाली अन् ती सर्वांची खुली होती. सर्वांचेच विचार घेऊन जिल्हा बँकेच्या बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून आपल्याला विश्वासात किंवा गृहीत धरले जात नाही, यात तथ्यच नाही, असे थोरातांनी म्हटले.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची (DCC Bank) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्जांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात अनेक तोलामोलाचे कार्यकर्ते असून, आपल्यालाही संधी मिळावी आणि नावाची चर्चा व्हावी, या अपेक्षेने काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून (Shivsena) जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चर्चेत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार आहे. यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी ही बाब फेटाळून लावली. असे काही नाही. माझ्याकडे बैठक घेऊन चर्चा करायची, असे सर्वांना सांगितले होते. त्यानुसार बैठक झाली. ही बैठक सर्वांसाठी खुली होती. सर्वांचे विचार घेऊनच पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे नेते राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याबाबतही थोरात यांनी भाष्य केले. राम शिंदे यांचा बँकेच्या कामकाजाबाबत वैचारिक दृष्टिकोन असून, जिल्हा बँक चांगली चालली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांना सध्याची परिस्थितीही चांगली माहिती आहे. त्यामुळे ते बँकेला पाठबळ देतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. राम शिंदे यांनी काही मागण्या मांडल्या आहेत. मात्र, त्यांचा अंतिम उद्देश जिल्हा बँकेला मजबूत करण्याचाच आहे, असे थोरात यांनी सूचित केले.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांच्यासह दोन्ही बाजूंचे नेते एका मंचावर येत असल्याने जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. थोरात म्हणाले की, येथे एकच भूमिका आहे. बँक चालली पाहिजे, वाचली पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. जिल्ह्यातील साखर कारखाने आणि दूध संघांच्या पाठीशी जिल्हा बँक भक्कमपणे उभी राहिली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता थोरात यांनी मान्य केली. मात्र, या अडचणींमुळे प्रयत्न थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अडचणी खूप येणार आहेत. पण चर्चा करत राहू. समोरच्याला बोलावून घेऊन चर्चा करू. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करत राहू, अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.