
Maharashtra political event 2025 : विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी सामना चांगलाच रंगला. एक-एक आमदार निवडून आणण्यासाठी महायुतीमध्ये चुरस लागली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार निवडून आणण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत होते. मात्र कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार, आताचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारासाठी अजित पवार जामखेडमध्ये आले नव्हते.
राम शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अजितदादांसाठी फिल्डिंग लावून देखील ते आले नव्हते. निकालानंतर राम शिंदेंनी अजित पवारांवर चांगलेच संतापले होते. जाणीवपूर्वक प्रचाराला आले नाही, असा आरोप राम शिंदेंनी अजितदादांवर केला होता. अजितदादा आता मात्र कर्जत-जामखेडमध्ये जाणार आहे. तिथं भाषण देखील ठोकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी गुरुवारी (ता.17) आयोजित केलेल्या ‘शिव-फुले-आंबेडकर’ संयुक्त जयंती महोत्सवाला अजितदादा जामखेडमध्ये एन्ट्री घेणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यादांच अजितदादा जामखेडमध्ये येणार असल्याचे, त्यांच्या या दौऱ्याची उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार हे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यापलीकडे जाऊन राम शिंदेंचे स्व:पक्षातील राजकीय शत्रू आणि जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही एकमेकांशेजारी बसणार आहेत. राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहाणारे अजित पवार, राम शिंदे (Ram Shinde) राधाकृष्ण विखे पाटील ही मंडळी एकाच वेळी, एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी या तिघांना एकत्र आणून संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये आपली राजकीय ताकद दाखविण्याची खेळी करीत आहेत. अजित पवारांना बोलावून, त्यातही जंगी कार्यक्रम घेऊन, संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये कोणाला ‘टशन’ देणार, हे पाहाणे महत्त्वाचे राहणार आहे.
संध्या सोनवणे महोत्सवातून कर्जत-जामखेडच्या राजकारणात वजन वाढवत असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संध्या सोनवणे या राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. त्यानंतर अजित पवार हे जामखेडमध्ये येत आहेत. या महोत्सवात कुठची कसर राहणार नाही, याची काळजी घेत कार्यक्रमाचे नियोजन केले जात असल्याचे संध्या सोनवणे यांनी सांगितले. महोत्सवात अजित पवार, राम शिंदे, विखे पाटील एकत्र येऊन कोण, कोणावर काय बोलणार? याकडे आता लक्ष असणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत-जामखेडला जाणीवपूर्वक सभा घेतली नाही. यातूनच आपला पराभव झाला. कर्जत-जामखेडमधील अजितदादांची यंत्रणा महायुतीचे कामच करत नव्हती, अशी तक्रार देखील विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी पराभवानंतर पक्षश्रेष्ठींकडे केली होती.
याच दरम्यान, ‘थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...’ अशी सूचक आणि मिश्किल टिपण्णी अजितदादांनी रोहित पवारांवर केली होती. यावरून देखील राम शिंदेंनी अजितदादांवर निशाणा साधला होता. कर्जत-जामखेडच्या निकालानंतरही हा मतदारसंघ चर्चेत आहे. रोहित पवार यांना राज्याचे नेतृत्व करायचे आहे, हे हेरूनच भाजप श्रेष्ठींनी प्रा. राम शिंदेंना विधान परिषदेवर संधी दिली. पुढं त्यांनाच विधान परिषदेचे सभापतीपदी विराजमान केले. त्यामुळे हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत आहे. अजित पवारांना आणून संध्या सोनवणे आता कोणता 'नेम’ साधणार? की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले ‘प्रमोशन’ करून पक्ष संघटनेत स्थान बळकट करणार, याची देखील चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.