

Ahilyanagar Karjat political meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र फाळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना हेरण्यासाठी इतर पक्षांकडून 'फिल्डिंग' लावली आहे. यात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आघाडीवर आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राजेंद्र फाळके यांची बैठक झाली असल्याची खात्रीलायक माहिती 'सरकारनामा'च्या हाती आली आहे. या दोघांची बैठक एक तासांपेक्षा प्रदीर्घ, अशी झाल्याची माहिती आहे. या बैठकीबाबत दोन्ही बाजूकडून मौन बाळगण्यात आलं आहे. त्यामुळे बैठकीत नेमकं काय शिजलं, याची उत्सुकता आता वाढली आहे.
शरद पवार यांच्याबरोबर गेली 40 वर्षे राजेंद्र फाळके राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. रयत शिक्षण संस्थेवर देखील ते कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटली, तरी फाळके हे शरद पवार यांच्याबरोबर उभे राहिले. लोकसभा निवडणुकीत, तर त्यांनी अजित पवार यांच्याकडे गेलेले आमदार नीलेश लंके यांना शरद पवार यांच्याकडे आणून खासदार मिळवून देण्यास कमालीची 'फिल्डिंग' लावली. त्यात यश देखील मिळालं. विधानसभा निवडणुकीत काहीशी गणितं फिस्किटली अन् अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे दहा आणि महाविकास आघाडीला दोनच जागांवर समाधान मानावं लागलं.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेल्या उलथापालथीला राजेंद्र फाळके यांचा विरोध होता. यातून पक्ष नेतृत्वावर ते नाराज देखील होते. तेव्हापासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहू लागले. यातून आता पक्ष संघटनेत बरेच बदल झाले आहेत. जयंत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार शशिकांत शिंदे यांच्याकडे गेला आहे.
राजेंद्र फाळके यांनी राजीनामा देताच, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी महायुती पक्षाकडून 'फिल्डिंग' लागल्याची खात्रीलायक माहिती 'सरकारनामा'च्या हाती लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना यात आघाडीवर आहे. राजेंद्र फाळके यांच्याशी थेट संपर्क साधून, थेट एकनाथ शिंदेंनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. ही चर्चा एका गावी झाली. एका तासापेक्षा अधिक वेळ झालेल्या चर्चेत, अनेक राजकीय गणितांची जुळवाजुळव झाल्याचे समजते. पण ही गणितं आताच उघड करण्याचं देखील ठरलं आहे.
शरद पवार यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून राजेंद्र फाळके यांची ओळख आहे. राजीनामा दिल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून साधी विचारपूस देखील झाली नसल्याची माहिती मिळते. फक्त पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अजून समोर आलेला नाही.
दरम्यान, भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी 'मौके पे चौका' मारत, राजेंद्र फाळके यांच्या घरी दिवाळी फराळासाठी हजेरी लावली. या दोघांमध्ये देखील प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. इतर पक्षाकडून देखील शरद पवार यांच्या शिलेदाराला हेरण्यासाठी संपर्क होत आहे. परंतु राजेंद्र फाळके नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
गेली 40 वर्षे साथ करत असलेले राजेंद्र फाळके शरद पवारांची खरचं साथ सोडणार का, या प्रश्नचं उत्तर आगामी काळच देईल. पण राजेंद्र फाळके यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते लवकरच 'बाॅम्ब फुटणार', अशी चर्चा करत आहेत. म्हणजेच, राजेंद्र फाळके निर्णयाच्या भूमिकेत असा दुजोरा त्यांच्या समर्थकांकडून मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.