

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र खरेदी-विक्रीविरोधात मोठी कारवाई करत पाच गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक केली आहे.
ही पिस्तुले धाराशिव जिल्ह्यातून विक्रीसाठी आणल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईत 10 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या शस्त्रांचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस (Police) निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध शस्त्र व्यवहारांवर कारवाई करण्याच्या सूचना पथकांना दिल्या होत्या. त्यानुसार शेंडी (ता. अहिल्यानगर) परिसरात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंडी बायपास मार्गावर सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका कारची तपासणी केली असता, भाऊ आनंदा रसाळ उर्फ पिंटू (वय 40, रा. रसाळवाडी, निघोज, ता. पारनेर Parner) आणि स्वप्नील बिभीषण पाबळे उर्फ बंटी (वय 30, रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे) (Pune) हे दोघे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून पाच गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे ऋषिकेश सुभाष भोसले उर्फ भैय्या (रा. धाराशिव) याच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, या कारवाईची माहिती मिळताच ऋषिकेश भोसले फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा पुढे नेमका काय वापर होणार होता, याबाबत तपास सुरू आहे. शस्त्र खरेदी-विक्रीच्या संपूर्ण साखळीचा आणि त्यामागील उद्देशाचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत आहे.
या कारवाईत अडीच लाख रुपये किमतीची पाच गावठी पिस्तुले, 40 हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि आठ लाख रुपयांची कार असा एकूण 10 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, अटक करण्यात आलेला भाऊ रसाळ उर्फ पिंटू आणि फरार आरोपी ऋषिकेश भोसले हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भाऊ रसाळ याच्याविरोधात सहा, तर ऋषिकेश भोसले याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिस कर्मचारी मनोज मोहन साखरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.