

Nilesh Lanke PM Modi meeting : साधेपणाची राजकीय प्रतिमा असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर खासदार नीलेश लंके यांनी कुणा साध्यासुध्या नेत्याची नव्हे, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अगदी जवळून, समोरासमोर! सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो पाहताच मॉर्फिंग किंवा एआय जनरेटेड तर नाही ना, अशी शंका येऊन नेटकऱ्यांनी दोन-चार वेळा निरखून फोटो पाहिले. लंके यांच्या ऑफिशियल हँडलवरुन पोस्ट आहे म्हटल्यावर खरेच असणार, अशी खात्री पटली.
खरी मेख मात्र पुढे लक्षात आली. ती म्हणजे ही पोस्ट पुढे तीन वेळा एडिट करून पुन्हा टाकण्यात आली! पंतप्रधान भेटीची पोस्ट तीन वेळा वेगवेगळ्या कॅप्शन बदलून का टाकण्यात आली? राजकीय तर्कवितर्क सुरू झाले ते इथे.
निमित्त होते महाराष्ट्रातील गड-किल्ले संवर्धन मोहिमेची माहिती देऊन रायगड सोहळ्याचं निमंत्रण देण्याचे. विशेष म्हणजे संसद भवनात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लंके यांनी मोदींची भेट घेतली. काँग्रेसच्या प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील लंके-मोदी यांच्या भेटीकडे कौतुकाने पाहात होत्या. मोदींनी देखील लंके यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यानंतर लंकेंनी (Nilesh Lanke) ‘फेसबुक’वर मोदी भेटीचा खास फोटो पोस्ट केला. सोबत अगदी भरून पावल्याप्रमाणे कॅप्शन देखील दिले. दुपारी अडीच वाजता पहिल्यांदा पोस्ट करताना लंकेंनी ‘अविस्मरणीय भेट’ म्हणत मोदींना ‘दूरदृष्टिपूर्ण नेतृत्व’ म्हटले. “देशसेवेच्या पवित्र कार्यात सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प दृढ झाला,” असेही सांगितले. अर्ध्या तासाने तीन वाजता पोस्ट एडिट करून अविस्मरणीय भेटीचा एका वाक्यात उल्लेख फक्त ठेवला. पुन्हा अर्ध्या तासानंतर ‘भेटीची क्षणचित्रे’ असल्याचे एका वाक्यात सांगितले.
मुळात हे फोटो पोस्ट होताच नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. “जाता का भाजपमध्ये” असा प्रश्न अनेकांनी केला. “लोणीला जाळ –धूर निघाला असेल” अशी मिश्किल टिप्पणी केली गेली. भरीस भर म्हणजे “आज मराठी माणूस पंतप्रधान पदाची शपथ घेणार होते ते तुम्हीच का?” विचारून राजकीय फिरकी घेतली तसेच “भेटी घ्या पण पवार साहेबांना सोडू नका” असे सल्ले देखील लंकेंना मिळाले.
पोस्ट एडिट करून टाकण्यामागे कारण काय, यावर तर जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगली. विरोधी पक्षाचे खासदार असताना सत्ताधारी नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक करू नये का? तसे केल्यास पक्षांतराची चर्चा होईल की काय? पक्षश्रेष्ठी उपस्थित असताना त्यांचा नामोल्लेख का टाळला?
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर विशेषतः अहिल्यानगरच्या त्यांच्या मतदारसंघातील भाजप नेते आणि समर्थक यांच्यावर विपरित परिणाम होईल का? राजकीय गणिते बदलण्याची ही चिन्हे असावीत का? अशा अनेक प्रश्नांना पूर्णविराम देण्यासाठी लंकेंनी पोस्ट दोन वेळा एडिट करून डॅमेज कंट्रोल केले की काय, अशी चर्चा मात्र सुरूच आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी लंकेंना आणखी एखादी पोस्ट करावी लागेल असे तूर्तास म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.