
Arun Jagtap last rites : विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप (वय 66) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 27 दिवस त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. आज सायंकाळी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगताप यांच्यामागे पत्नी पार्वतीबाई, मुलगी डॉ. वंदना फाटके, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व आमदार संग्राम जगताप, तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अरुणकाकांचे पार्थिव दुपारी भवानीनगर येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करीत अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून निघून महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, जिल्हा सहकारी बॅंक, स्वस्तिक चौक, टिळकरोड मार्गे आयुर्वेद कॉलेजजवळ आली. तेथे नगरमधील पदाधिकारी, तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहत पुष्पचक्र अर्पण केले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता. त्यानंतर नालेगाव येथील आमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी (Police) बंदुकीतील तीन फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली.
अमरधाममध्ये शोकसभा झाली. श्रद्धांजली वाहताना अनेकांनी अरुणकाकांविषयी आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली दिली. क्रीडामंत्री दत्ता भरणे, खासदार नीलेश लंके, आमदार शिवाजी कर्डिले, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे संभाजी कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भोस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी, शिवसेनेचे विक्रम राठोड व अंबादास पंधाडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे माजी महापौर अंकुशराव काकडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, आष्टी पाटोद्याचे माजी आमदार दरेकर नाना व भीमराव धोंडे, तसेच मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आठवणींना उजाळा दिला.
अरुणकाका यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असताना गेले 27 दिवस जिल्हाभरातून हजारो नागरिकांनी पुण्यात रुग्णालयात भेट देली. जिल्हाभरातील धार्मिक स्थळांत त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात येत होती. काकांची प्रकृती सुधारावी म्हणून अनेकांनी नवस केले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. तज्ज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, तथापि, त्याला यश आले नाही.
महाराष्ट्रातील राजकारणात अरुणकाकांचा सहभाग असे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते एकेकाळची खंदे समर्थक होते. अखेरपर्यंत त्यांचे पवार यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध होते. अरुणकाका यांची 1990 मध्ये नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. पाच वर्षे अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. आयुर्वेद सेवा शास्त्र सेवा मंडळाचे ते अध्यक्ष होते. खेळाची त्यांना विशेष आवड होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य होते. कोरोना काळात त्यांनी कोविड सेंटर उभारून नागरिकांना आधार दिला. हिंद केसरी कुस्ती स्पर्धा घेऊन पहिलवानांना प्रोत्साहन दिले. मंदिरांची उभारणी, गोशाळा उभारणी केली. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली पंढरीची दिंडी चुकविली नाही. विधानपरिषदेत आमदार झाल्यावर त्यांनी शहरासाठी मोठा निधी मिळविला. आमदार संग्राम जगताप यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.