
Shrirampur police help center notice : जलसंपदा विभागाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणावर कारवाईसाठी विभागानं पावलं उचलली असून, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रालाही अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे.
मार्च 2025 मध्ये तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या हस्ते या पोलिस केंद्राचा प्रारंभ करण्यात आला होता. या पोलिस मदत केंद्रावर जलसंपदा विभागाचा 'बुलडोजर' फिरणार असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.
श्रीरामपूरमधील (Shrirampur) बेलापूर रोड सिंचन शाखेच्या कार्यक्षेत्रातील कालवा हद्दीत विविध ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत जलसंपदा विभागाने अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन सात दिवसांची मुदत दिली आहे. ही जमीन जलसंपदा विभागाच्या मालकीची असल्याने, ताब्यात घेतलेली जागा नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत रिकामी करावी, अन्यथा महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, श्रीरामपूर शहर पोलिस (Police) ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस मदत केंद्राच्या दरवाजावर नोटीस डकविण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनीच विभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पाटबंधारे विभागाने कारवाईमुळे जर कोणतेही नुकसान झाले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकांची राहील, असे स्पष्ट केले आहे.
कालव्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणधारकांना सात दिवसांनी अंतिम नोटीस बजाविण्याचे काम सुरू आहे. प्रथम शहर हद्दीतील अतिक्रमणधारकांना सरस्वती काॅलनीपासून नोटीस बजावण्यात येत आहेत. पोलिस मदत केंद्रासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहेत. मदत केंद्र पालिका हद्दीत हलविण्यात येणार आहे. मदत केंद्राला नोटीस देण्याचा कोणाताही उद्देश नव्हता, या केंद्रामुळे कालव्यात घाण टाकणाऱ्यांना उलट अटकावच झाला आहे. अतिक्रमण काढण्याबाबत मंत्रीमहोदय व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरवात होईल, असे उपविभागय अभियंता संजय कल्हापुरे यांनी सांगितलं.
पोलिस चौकीसंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार झालेला होता. या ठिकाणी काही जागा पाटबंधारे व काही पालिकेची आहे. त्यामुळे केंद्र पाटबंधारेच्या हद्दीत असेल तर ते पालिका हद्दीत हलविण्याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याशी चर्चा झाली आहे. कायद्याचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी भूमिका श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.