

Sugarcane Rate Maharashtra 2026 : दुष्काळात शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे उसाला चार हजार रुपये प्रतिटन दर मिळालाच पाहिजे, या मागणीवर ठाम आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून, त्यातील सात कारखान्यांनी दर जाहीर केला आहे, तर 11 कारखान्यांच्या दरांची प्रतिक्षा आहे.
दर जाहीर केलेल्या कारखान्यांना 3000 ते 3200 रुपयापर्यंत उचल दिली आहे. या दरावर शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. यासाठी 23 नोव्हेंबरला राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना घेरावा आंदोलन जाहीर केले असून, या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी, कारखांनदार आणि जिल्हा प्रशासन यात संघर्ष तीव्र होणार असल्याचे चिन्हे आहेत.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना होऊन गेला असून, आतापर्यंत सुमारे 30 लाख 20 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून 25 लाख 37 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असले, तरी उसाच्या दराचा तिढा अद्याप कायम आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवघ्या सात कारखान्यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणारी पहिली उचल जाहीर केली आहे. त्यात थोरात आणि काळे या दोन कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार 200 रुपये, तर ज्ञानेश्वर, अशोक, मुळा, ढाकणे आणि अगस्ती या पाच कारखान्यांनी तीन हजार 100 रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित 11 कारखान्यांच्या दराची प्रतीक्षा कायम आहे.
गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, तरी ऊसदराचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शेतकरी (Farmer) संघटनांकडून राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये प्रतिटन चार हजार 200 रुपये, तर नगर जिल्ह्यात किमान चार हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कारखानदारांकडून एवढा दर देण्यास असमर्थता दर्शविण्यात येत आहे. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित बैठका झाल्या. पण त्यावर तोडगा निघाला नाही.
दरम्यान अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना उपलब्ध होणाऱ्या कर्जावरही ऊस दराचे गणित अवलंबून असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. साखर पोत्यांच्या किमतीनुसार बँकेकडून कारखान्यांना कर्जपुरवठा केला जातो. मात्र, यंदाचा हंगाम सुरू होऊनही कारखान्यांना अपेक्षित कर्ज उपलब्ध झालेले नाही. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची निवड झाली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जपुरवठ्याबाबत काय निर्णय होतो, यावरही ऊस दराचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, साखर सहसंचालक कार्यालयाने कारखान्यांना शेतकऱ्यांना देण्यात येणारा दर आणि पहिली उचल जाहीर करण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपूनही जिल्ह्यातील सुरू असलेल्या 18 सहकारी व खासगी कारखान्यांपैकी केवळ सात कारखान्यांनीच पहिली उचल जाहीर केली आहे. त्यामुळे उर्वरित 11 कारखाने किती दर देणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह पहिली बैठक कधी होणार, याची उत्सुकता साखर कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. ही बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु सध्या पुढील बैठकीचे नियोजन निश्चित नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यांना किती कर्जपुरवठा होणार, याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता असल्याने ऊसदराचा तिढा सुटण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.