Ahmednagar News: नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेला भिंगार शहराचा नागरी भाग नगर महापालिकेत वर्ग होण्यासाठी दिल्ली येथे अधिवेशनात मंत्रालयात बैठक घेऊ, राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार होऊन तो कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आणि त्यानंतर डिफेन्स विभागाकडे प्रस्ताव जावून त्यावर दिल्ली सरकारकडून मंजुरी मिळेल. राज्य सरकारच्या या प्रस्तावावर डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू होईल. यानंतर पुढील प्रक्रियेला चार ते सहा महिन्यात भिंगारचा नगर महापालिकेत समावेश होईल, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली.
नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगारचा नगर महापालिकेत समावेश होण्यासाठीची महत्त्वपूर्ण बैठक आज नगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. खासदार सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी सुरूवातीला 'पीपीटी'व्दारे मांडणी करत महापालिकेत समावेश होण्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डिफेन्सच्या नियमामुळे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहराला चटई क्षेत्राच्या मर्यादा आहेत. भिंगार शहर महापालिकेत समावेश झाल्यावर चटई क्षेत्रात काय फरक पडेल, यावर खासदार विखेंनी प्रकाशझोत टाकला. महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग अॅक्टनुसार बांधकाम नियम लागू होतील.
रस्त्याच्या रुंदीनुसार बांधकामाला चटई क्षेत्र लागू होईल (म्हणजेच नऊ मीटर रुंदीचा रस्ता असल्यास बांधकामाला चटई क्षेत्र 1.07 मिळेल). परंतु भिंगार शहरातील अंतर्गत रस्त्यांची रचना पहिल्यास त्याची रुंदी खूपच कमी आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यानंतर देखील भिंगारच्या चटई क्षेत्रात वाढ होईल, असे होणार नाही, असे खासदार विखेंनी स्पष्ट केले.
एमईएस ही एमआयडीसीकडून पाणी घेऊन नगरमधील डिफेन्स क्षेत्राला पाणीपुरवठा करते आणि भिंगार शहराला कॅन्टोनमेंट डिफेन्सकडून पाणी घेते. महापालिकेत समावेश झाल्यानंतर लगचेच भिंगारला महापालिकेकडून पाणी मिळू शकणार नाही. महापालिका देखील ते देवू शकणार नाही.
डिफेन्स विभागातील अधिकाऱ्यांशी यावर बैठक झाली असून, भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर देखील कॅन्टोनमेंटमार्फतच भिंगारला पाणीपुरवठा होईल. पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना भिंगारमध्ये राबवल्या जातील. यासाठी किमान तीन वर्षे लागतील, असेही खासदार विखेंनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी यावेळी हुकुमशाहीपेक्षा लोकशाहीमध्ये स्वागत आहे, असे सांगून भिंगारच्या नागरी भागाचा महापालिकेत समावेश होत असल्याचे स्वागत केले. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गर्दी केलेल्या नागरिकांना महापालिकेत समाविष्ट होणार का ? असे विचारल्यावर नागरिकांनी दोन्ही हात उंच करून होकार दर्शवला.
भिंगारचा महापालिकेत समावेश होण्यासाठी 2019 पासून पाठपुरावा सुरू आहे. कोविड आणि सत्तांतरामुळे हा विषय मागे पडला. परंतु आता हा विषय प्राधान्याने मार्गी लागणार आहे. भिंगार उपनगर म्हणून अस्तित्वात आल्यावर त्याच्या विकासासाठी राज्य आणि केंद्राकडून निधी आणू, असे जाहीर आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.
दरम्यान, या बैठकीत कॅन्टोनमेंट बोर्डाकडून नागरिकांना मिळत असलेल्या वागणुकीविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. एकप्रकारे नागरिकांनी बैठकीत कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. 'अकार्यक्षम सीईओ', अशी पदवी द्यावी, अशी मागणी काहींनी केली. यामुळे बैठकीत गदारोळ झाला. नागरी सुविधांपासून ते जमिनीशी निगडीत असलेल्या वादापर्यंत सर्व रोष नागरिकांनी बैठकीत मांडले. खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी यावर हस्तक्षेप केला.
नगर कॅन्टोनमेंटच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहराचा महापालिकेत समावेश होण्याऐवजी स्वतंत्र नगरपालिका द्यावी, असा सूर काहींनी बैठकीत आवळला. यावर खासदार विखे म्हणाले, ही क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. नागरदेवळे, बाराबाभळी आणि वडारवाडी अशी तिन्ही मिळून नगरपालिका मंजूर झाली होती. परंतु नागरदेवळे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ग्रामपंचायतीत राहण्याचे ठरवले. आता भिंगार शहराला एकतर महापालिका किंवा ग्रामपंचायतीत समावेश व्हावे लागेल. यानंतर तुम्हाला नगरपालिकेसाठी पाठपुरावा करता येईल, असे ते सांगितले.
भिंगार शहराचा महापालिकेत समावेशच्या निर्णयाच्या बैठकीवर भिंगारमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले. कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी सदस्यांनी आणि ज्येष्ठ राजकीय पदाधिकारी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. कॅन्टोनमेंटचे जुने कागदपत्र काढून नगरपालिकेची मागणी केंद्र आणि राज्याकडे कारणार असल्याची तयारी सुरू केली आहे.
नगर महापालिकेत नगर कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहरातील बराच भाग वर्ग होणार आहे. यात भिंगारमधील शिवाजी पार्क, भिंगार टेकडी, हाॅस्पिटल, चारही शाळा, सार्वजनिक स्वच्छता गृह, असा सर्व मोठा भाग तिकडे वर्ग होईल. नगर कॅन्टोनमेंट बोर्डाकडे असलेल्या 662 मूळ आणि 82 भाडेतत्त्वावर असलेल्या प्राॅप्रर्टी वर्ग होतील. तसेच 164 पैकी 100 कर्मचारी महापालिकेत वर्ग होतील. ब्रिटिशकालीन बंगले मात्र कॅंटोन्मेंट बोर्डाकडेच राहतील.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.