Ahmednagar News : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू झाली असून त्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच 16 ॲप हे प्रशासनाच्या माध्यमातून वापरले जाणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Latest Marathi News)
दरम्यान, नगर शहरांमध्ये भाजपबरोबर इतर राजकीय पक्षांनी लावलेले जाहिरात फलक काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या पुढील काळामध्ये परवानगी घेऊनच फलक लावले जातील. समाज माध्यमांवरील निवडणूक आयोगाकडून कोणत्याही गाईडलाईन नसल्या, तरी समाज माध्यमांवरील मजकुरावर काटेकोर लक्ष राहणार आहे, असे कोळेकर यांनी सांगितले. तसेच नगर जिल्ह्यातील 15 हजार जणांवर वेगवेगळ्या कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर म्हणाले, "नगर जिल्ह्यामध्ये आजपासून आचारसंहिता सुरू झाली आहे. एकाच दिवशी दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. 13 मे रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, याकरता प्रशासनाची तयारी सुरू केली आहे. पहिल्या पातळीवर सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे अंतिम तारीख ही 25 एप्रिल ही राहणार आहे. अर्जाची छाननी 26 एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 29 एप्रिल हा राहणार असून 13 मे रोजी मतदान होईल".
प्रशासनाने माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीत सात जणांची नियुक्ती केली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे त्याचे अध्यक्ष आहेत. जिल्हा माहिती अधिकार रवींद्र ठाकूर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. पेड न्यूज संदर्भामध्ये सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच जाहिरात संदर्भामध्ये सुद्धा वेगळी, अशी समिती नियुक्त करण्यात आलेले आहे. सर्वांना परवानगी घेऊनच पुढे आपल्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. त्याकरता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची नियुक्ती करण्यात आल्याची त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडावे याकरता आपण जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह 21 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचेही कोळेकर यांनी यावेळी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात दोन लोकसभेचे मतदार संघ आहेत. एकूण मतदानाची संख्या ही 36 लाख 35 हजार 366 एवढी आहे. त्याचप्रमाणे यंदा ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा पुढे आहे, असे नगर जिल्ह्यामध्ये 59 हजार 975 मतदार आहेत. या मतदारांना घरी सुद्धा मतदान करता येईल, अशी यावेळी नियोजन केले आहे. नगर जिल्हा करता एकूण 3734 मतदान केंद्र असून प्रत्येकी पाच कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांना कोणती प्रकारची माहिती लागत असल्यास त्यांनी 1950 या टोल फ्री क्रमांक वरुन त्यांना माहिती उपलब्ध होईल, असे कोळेकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार एकूण मतदान केंद्राच्या 50% केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून नगर जिल्ह्यामध्ये 3734 मतदान केंद्रापैकी 1867 मतदान केंद्राचे वेब कास्टिंग तयार करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यामध्ये ज्यांचे वय वर्ष 100 पेक्षा जास्त आहे, असे मतदार 1899 आहे. तर 110 वयाच्या पेक्षा जास्त असलेले दोन मतदार या जिल्ह्यामध्ये आहेत. यावेळेस तर नवं मतदारांची यावेळेस 2 लाख 13 हजार 920 नोंदणी झालेली आहे.त्यात नवीन 46 हजार 539 मतदार आहे.
नगर जिल्ह्यामध्ये चार मतदान केंद्र अशी आहेत की त्या ठिकाणी 10% पेक्षाही कमी, असे मतदान (Voting) झाले आहे. त्याची माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढीवर भर दिला आहे. या चार मतदान केंद्रांना क्रिटिकल. असे मतदार केंद्र संबोधले केले आहे.
नगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्था बिघडू, नये याकरता पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी एकूण 7 हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.