
Nashik News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने सत्ताधारी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकासाठी भाजपने शत प्रतिशतचा दावा केला आहे. दुसरीकडे नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप सहकारी पक्षांनाही फारसे महत्त्व देण्यास तयार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यात विशेष लक्ष घातले आहे. निवडणूक महायुती म्हणून लढविली जाणार आहे. मात्र, भाजपचा दावा शतप्रतिशत असा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागांवर भाजपचा दावा असणार आहे.
नाशिक महापालिकेत भाजप जोरात कामाला लागला आहे. मात्र ग्रामीण भागात या पक्षाची मोठी राजकीय अडचण झाली आहे. भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. यातील तीन आमदार नाशिक शहरात आहेत. दोन आमदार देवळा, चांदवड आणि बागलाण यातील तालुक्यांचे प्रतिनिधित्व करतात. या आमदारांच्या कार्यक्षेत्रात फक्त 15 जिल्हा परिषद गट आणि तीन पंचायत समित्या आहेत.
सामान्यता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक आमदाराचे वर्चस्व असते. राज्य शासनाच्या बहुतांशी योजनांचे लाभ मिळविण्यासाठी पंचायत समिती आमदारांना आपल्या ताब्यात ठेवावी लागते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागते.
जिल्ह्यातील 72 जिल्हा परिषद गटांपैकी अवघ्या 15 गटांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे प्रभावी काम मालेगाव मध्य मतदारसंघात होते. सात पैकी पाच सदस्य भाजपचे होते. सध्या राजकीय चित्र बदलले असून अद्वय हिरे भाजपसोडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात गेले आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे हे आमदार आहेत. भुसे हे मंत्री देखील आहेत. त्यामुळे भाजपच्या ताब्यातील या जागा हिसकावण्यासाठी मंत्री भुसे यांना पूर्ण ताकद पणाला लावतील.
भाजपला ग्रामीण राजकारणात आपला प्रभाव आणि जिल्हा परिषदेतील जागा वाढविण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागणार आहेत. सध्या तरी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची स्थिती पाहता भाजपला मोठी कामगिरी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्यात त्यांना मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मोठे आव्हान असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. या आमदारांच्या कार्यक्षेत्रात 10 पंचायत समित्या आणि 46 जिल्हा परिषद जागा आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अतिशय रंजक चित्र पाहायला मिळणार अशी स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.