

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाही. परंतु दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. त्यांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला. दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्देवी निधनावर शोक व्यक्त केला. भुजबळांच्या पाठोपाठ पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ व मुलगा आमदार पंकज भुजबळ हे दोघेही अजित पवारांच्या निधनाने भावूक झाले असून त्यांनीही शोक व्यक्त केला आहे.
अजितदादा यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक खंबीर 'लोकनेता' आणि जनतेने आपला हक्काचा 'दादा' गमावला आहे. त्यांनी दिलेला शब्द म्हणजे "काळ्या दगडावरची रेघ" असायची. अजितदादा म्हणजे प्रशासकीय शिस्त आणि विकासाच्या दृष्टी असलेला एक वेगळाच झंझावात होते. मंत्रालयापासून ते गावाकडच्या बांधापर्यंत ज्यांच्या नावाचा दरारा होता, तो करारी आवाज आज कायमचा शांत झाला असं पंकज भुजबळ यांनी म्हटलं आहे.
सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि कार्यकर्त्यांना आधार वाटणारा हा आधारवड कोसळल्याने, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दादा, तुमचा करारी बाणा, सामान्य माणसाच्या हिताबद्दलची तळमळ आणि कामाचा झंझावात महाराष्ट्राच्या मातीला तुमची नेहमीच आठवण करून देत राहील.
पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना विधानपरिषद सदस्य व मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी केली.
तसेच छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ हे देखील अजित पवारांच्या निधनाने भावूक झाले. अजितदादांच्या निधनाची बातमी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यावर सर्वात मोठा आघात आहे. दादा आमच्यासाठी फक्त नेते नव्हते, तर पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक आधार, एक हक्काचा मार्गदर्शक होते असं समीर भुजबळांनी म्हटलं आहे.
राजकीय स्थित्यंतरे घडत होती, त्या कठीण काळातही दादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि पक्षाची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवली होती. दादांचा तो विश्वास खूप मोलाचा होता.
प्रशासनावर पोलादी पकड, स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणा ही बलस्थाने असणारे अजितदादा, सर्वांसाठीच आदर्श होते. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांची असलेली तळमळ, कामाचा आवाका आणि ऊर्जा आमच्यासाठी कायम प्रेरणास्थानी राहील. आज महाराष्ट्र पोरका झाल्याचे भावना समीर भुजबळांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.