Ajit Pawar News: "एकच वादा, अजित दादा"अशा घोषणा नाशिकच्या निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांनी उत्साहाने दिल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मतदारांनी भरभरून मतदानही केले होते. मात्र निवडणुकीत केलेला `वादा` आता अजितदादा विसरले की काय? अशी स्थिती आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक संकटात सापडली आहे. हे बँक सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि राजकारणाचे केंद्र म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. मात्र एकही राजकीय नेता किंवा आमदार यांच्या अजेंड्यावर नाशिक जिल्हा बँकेचा विषय नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिंडोरी येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. मतदारांना आवाहन करताना लाडकी बहीण योजनेपासून तर वीज माफी, अन्य सवलती याबरोबरच अगदीच कर्जमाफी सुद्धा करीन असे आश्वासन त्यांनी दिले होते.
निफाड येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी विदर्भातील एका बँकेचा दाखला देत शासनाने त्या बँकेला अर्थसहाय्य केले होते. तसेच अर्थसाह्य जिल्हा बँकेला सुद्धा करता येईल का? याचा विचार करीन असे म्हटले होते. हा व्हिडिओ लाईव्ह झाला होता आमदार दिलीप बनकर यांच्या फेसबुक वर तो अनेक दिवस होता. आमदार बनकर हे देखील जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले आहेत.
सध्या जिल्हा बँकेपुढे १०४२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान आहे. यामध्ये पाच लाख रुपयाहून अधिक थकबाकी असलेल्यांची संख्या ६३ टक्के आहे. यामध्ये प्रामुख्याने राजकारणात सक्रिय असलेल्यांची संख्या मोठी मांडली जाते.
जिल्हा बँकेने ६३५ कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाला तीन वर्षांपूर्वी सादर केला आहे. हा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांनाही दिला होता. मात्र या मंत्र्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्हा बँकेच्या कारभारात यापूर्वीही रस घेत होते. प्रशासक नियुक्तीत त्यांचा पडद्यामागून मोठा सहभाग होता. आता जिल्हा बँक अडचणीत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः त्याबाबत आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला की काय अशी स्थिती आहे. या आश्वासनाची जाणीव जिल्ह्यातील आमदार आणि मंत्री उपमुख्यमंत्री पवार यांना करून देतील का? अशी चर्चा सुरू आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.