Ahmednagar Political News : विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होईल. त्यामुळे राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमधील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यातच नगर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांचा उमेदवार देण्यासाठी वापरलेली क्लृप्ती चर्चेत आली आहे. परंतु यामुळे महायुतीमधील मित्र पक्ष असलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारांचे टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणूक (Election) 2024 साठी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहे. प्रदेश भाजपचे पक्ष निरीक्षक महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नगर शहरातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पसंती क्रमांकाने मतदान करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानासाठी शहरातील 266 प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेले इच्छुक उमेदवारांच्या नावाची बंद पाकिटे पक्ष निरीक्षक महेश हिरे प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द गेली जाणार आहेत.
नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, राजेंद्र काळे, मुकुंद देवगावकर, सचिन पारखी व ज्योती दांडगे आदींनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे या बैठकीत सांगितले. यातील तीन जणांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पसंती क्रमाने नावे लिहून मतदान केले. आता या इच्छुकांचे भवितव्य पाकिटात बंद झाले आहे. यावेळी 266 पैकी शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांनी या मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
महेश हिरे म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून पूर्ण राज्यात इच्छुक उमेदवारांची नावे व पदाधिकाऱ्यांच्या मनातील उमेदवार जाणून घेण्यासाठी ही सुटसुटीत आणि चांगली मतदान प्रक्रिया राबव्यात येत आहे. कोणताही वाद किंवा तक्रारी येवू नये, यासाठी लोकशाहीच्या मार्गाने ही प्रक्रिया राबवण्यात आली. महायुतीच्या जागा वाटपात नगर शहर मतदारसंघ भाजप सुटावा, अशी मागणी मी प्रदेशाकडे करणार आहे".
नगर शहर विधानसभेसाठी भाजपने त्यांच्याकडील इच्छुकांसाठी मतदान प्रक्रिया राबवून महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे. नगर शहरात महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षाचे आमदार संग्राम जगताप आहेत. अजित पवार यांच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत संग्राम जगताप फायनल आहे. तसंच त्यांनी गेल्या सहा महिन्यापासूनच निवडणुकीच तयारी केली आहे. सध्या शहरातील प्रत्येक चौकात त्यांचे मोठमोठाले बॅनर झळकले आहेत. यातच भाजपने नगर शहर विधानसभेवर दावा सांगितल्यानं राष्ट्रवादीमध्ये टेन्शनचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दावा केलाय खरा, पण तो पक्षश्रेष्ठींसमोर कितपत टिकतो, हे देखील पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.