

Sunetra Pawar latest news : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संगमनेर तालुक्यातील घारगाव आणि परिसराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जाताना ते अनेकदा घारगाव येथे थांबत असत.
येथील पेढे त्यांना विशेष आवडायचे. ग्रामस्थांशी संवाद साधतानाच परिसरातील विकासकामे आणि प्रश्नांबाबतही ते सकारात्मक भूमिका घेत असत, अशी आठवण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्दन आहेर यांनी सांगितली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून लोणीकडे जात असताना जनार्दन आहेर यांनी त्यांना संगमनेरच्या (Sangamner) घारगाव येथे थांबवून सत्कार केला. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अजित पवार यांच्या घारगावशी असलेल्या जुन्या संबंधांना उजाळा देताना आहेर भावूक झाले.
“अजितदादा (Ajit Pawar), आम्ही नेहमीच घारगाव येथे थांबत असायचो. त्यांना येथील पेढे खूप आवडायचे. पिंपळगाव खांड धरणाचा प्रश्नही त्यांनी मार्गी लावला. मुळा नदी बारमाही झाली,” असे आहेर यांनी सांगितले. पिंपळगाव खांड धरणाच्या माध्यमातून परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही आहेर यांनी नमूद केले. धरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने मुळा नदी बारमाही झाली आणि त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना झाला, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार ज्या आपुलकीने घारगाव येथे थांबत होते, त्याच आपुलकीने “तुम्हीही पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जाताना घारगाव येथे थांबत जा,” अशी भावनिक विनंती जनार्दन आहेर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. आहेर यांनी यावेळी त्यांच्या आणि अजित पवार यांच्या जुन्या आठवणीही सांगितल्या. अनेकदा अजित पवार यांना घारगाव येथे थांबवून त्यांचे स्वागत केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या माध्यमातून परिसरातील विविध विकासकामे मार्गी लागल्याचेही आहेर यांनी सांगितले.
घारगावशी संबंधित जुन्या राजकीय आठवणी सांगताना आहेर यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचाही उल्लेख केला. त्यांनाही घारगाव येथे थांबवून छोटेखानी सभा घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यानंतर अजित पवार यांनीही घारगाव येथे थांबून त्यांचे स्वागत केले होते. आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्याच घारगावमध्ये थांबवून आहेर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे या भेटीला भावनिक संदर्भ प्राप्त झाला. “दादा आज नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत,” या भावनेतून आहेर यांनी अजित पवार यांच्या घारगावशी असलेल्या जिव्हाळ्याचा उल्लेख केला. या प्रसंगामुळे अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.