

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमात विवेक कोल्हे यांचे कौतुक करत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या खास चर्चेचा उल्लेख केला.
अजितदादांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून विवेक कोल्हेंनी त्यांच्या दिलखुलास स्वभावाचे कौतुक केले.
विवेक कोल्हेंनी अजितदादांना “बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणणारे नेते” असे संबोधून त्यांचा स्पष्टवक्तेपणा अधोरेखित केला.
Ahilyanagar, 24 October : अजितदादा पवार हे माझे जाहीरपणे कौतुक करतील, असं मला अजिबात अपेक्षित नव्हतं. पण त्यांचा स्वभाव बघता, एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि पोटात एक अन् ओठात एक, अशातील अजितदादा नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गाडीत झालेली चर्चा जाहीरपणे सांगून टाकली. त्यांनी पेपरच फोडला, आता ती गाडीतील चर्चा बाहेर होणं, अमितभाईंना अपेक्षित होतं की नाही, याची कल्पना नाही. पण, अजितदादांनी गाडीत आमची अशी चर्चा झाली. त्यामुळे जे तुमच्या मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे, अशी आठवण भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी सांगितली.
विवेक कोल्हेंबाबत जे तुमच्या (जनतेच्या) मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर केले. त्यानंतर सभेत एकच जल्लोष झाला. त्यावर बोलताना युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री पवारांच्या स्वभाववैशिष्ट्याचे कौतुक केले.
विवेक कोल्हे (Vivek Kolhe) म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादा जेव्हा भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी स्नेहलताताई कोल्हे यांना सांगितलं होतं की, मागील निवडणुकीत ८०० मतांचे लीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला होतं. मला आता त्याच्या पुढे दोन शून्य पाहिजेत (म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ८० हजारांचे लीड मिळावं) अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
स्नेहलता कोल्हे यांनी सांगितलं होतं की, आम्ही जेवढं प्रामाणिकपणं काम होतं, तेवढं करण्याचा प्रयत्न करू. त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं तर ते आमच्याकडून देण्याचा प्रयत्न होईल. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे सव्वा लाख मतांनी निवडून आले. नेत्यांचा मोठेपणा कशात असतो. आमचे आमदार काही दिवसांपूर्वी म्हणाले की, काय केलंय, कशी मदत केली आहे. उपकराची भाषा करता, आम्ही खरं खोटं करू, असं त्यांच्या कार्यक्रमात बोलले, असे कोल्हे यांनी नमूद केले.
नेते मोठे कसं होतात, हे सांगताना विवेक कोल्हे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन्ही हात जोडून तुमच्या सगळ्या संजीवनी परिवाराचे लाख लाख आभार, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले होते. त्यामुळे अजितदादा हे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणणारे नेते आहेत. ते काय कोणाचं लांगूनचालन करतील, असं मी कधी बघितलेलं नाही.
काम होत असेल तर हो म्हणतात आणि काम होणार नसेल तर ही फाईल घेऊन निघ इथून, असे म्हणणारे अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांनी जे खरं होतं ते सांगितलं. त्यांनी पेपरच फोडला, आता ती गाडीतील चर्चा बाहेर होणं, अमितभाईंना अपेक्षित होतं की नाही, याची कल्पना नाही. पण अजितदादांनी सांगून टाकलं की, गाडीत आमची चर्चा झाली. जे तुमच्या मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे, असेही जाहीरपणे सांगितले.
Q1. अजित पवार यांनी कोणाचे जाहीरपणे कौतुक केले?
A1. त्यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचे जाहीरपणे कौतुक केले.
Q2. अजित पवार आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली होती?
A2. गाडीत झालेल्या चर्चेचा अजित पवारांनी सभेत खुलासा केला, ज्यात विवेक कोल्हेबाबत सकारात्मक मत व्यक्त झाले.
Q3. विवेक कोल्हेंनी अजित पवारांविषयी काय मत व्यक्त केले?
A3. त्यांनी अजित पवार हे दिलखुलास आणि स्पष्टवक्ते नेते असल्याचे सांगितले.
Q4. अजित पवारांचे विधान चर्चेत का आले?
A4. कारण त्यांनी अमित शाहांसोबतची खाजगी चर्चा सार्वजनिकपणे सांगून ‘पेपर फोडला’.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.