जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेलचे जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (All-party panel Seat's allocation for Jalgaon District Bank elections fixed)
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सर्वपक्षीय पॅनेल निश्चित करण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत, त्यांनी सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भारतीय जनता पक्ष नको, अशी भूमिका बैठक करून घेतली होती. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल होणार की नाही, या बाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनेल करण्याबाबत आज (ता. ९ आक्टोबर) जळगाव येथील अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, काँग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील व चिमणराव पाटील उपस्थित होते.
या बाबत माहिती देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आमचे सर्वपक्षीय पॅनेलचे जागावाटप निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांना प्रत्येकी सात जागा, शिवसेनेला पाच, तर काँग्रेसला दोन जागा देण्यात येणार आहेत. आता प्रत्येक पक्ष त्यांच्या राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईल, त्यानंतर या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले, आमच्या नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याने अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता जागा वाटप निश्चित झाले आहे, त्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.