
Nashik ZP News : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यात दोन वर्षे दहा महिने प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली. मित्तल यांच्या जागी अद्याप कोणाच्याही नियुक्तीचे आदेश प्राप्त झालेले नाही. बुधवारी (दि. 30) मुंबई मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने मित्तल यांची बदली जालनाच्या जिल्हाधिकारी पदी केल्याचे नियुक्ती पत्र पाठविले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आशिमा मित्तल यांची नाशिक येथे बदली करण्यात आली होती. त्यावेळी त्या पालघर येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त केलेल्या आशिमा मित्तल या तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीतील होत्या. या नियुक्तीमागील विशेष बाब अशी होती की, यापूर्वी देखील महिलाच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होत्या आणि त्यानंतरही आशिमा मित्तल यांच्या रूपाने महिलाच मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्या. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेला आता मित्तल यांच्या जागेवर सलग तिसऱ्यांदा महिलाच मुख्य कार्यकारी अधिकारी मिळणार का ? अशी चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची 28 सप्टेंबर २०२३ रोजी बदली झाली. बनसोड यांच्या जागी आशिमा मित्तल यांची नाशिकला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या जागी आशिमा मित्तल यांची बदली झाली आहे. मित्तल यांना तत्काळ पदभार स्वीकरण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे (30 सप्टेंबर 2023) सांभाळल्यापासून मित्तल यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यामुळे अनेक पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेला मिळाले. त्यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात 'सुपर 50' हा उपक्रम राबवण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व गुणवत्ताधारित शिक्षणाची संधी देणारा हा उपक्रम तीन वर्षे यशस्वीपणे राबविण्यात आला. राज्यस्तरावर या उपक्रमाची दखल घेतली गेली.
कुपोषण निर्मूलनासाठीही त्यांनी 'बेस्ट फीडिंग' हा प्रभावी उपक्रम राबवला. शिक्षण व आरोग्य विभागात त्यांनी भरीव कामगिरी बजावली. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाले असून इमारतीचे उद्घाटन त्यांच्या कारकिर्दीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. या इमारतीचे कामकाज गतिमान करण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला.
'सुपर 50' सह सीएसआर फंडातून बस, दिव्यांगासठी अनेक उपक्रम, ग्रामीण भागात विविध योजना राबविल्या. त्यांच्याच कार्यकाळात राज्य शासनाच्या '100 दिवस' उपक्रमात नाशिक जिल्हा परिषदेला राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांत नाशिक जिल्हापरिषदेचा उल्लेखनीय सहभाग राहिला.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण हेही त्यांच्याच कारकिर्दीत गाजले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून उभा राहिलेला संशय औद्योगिक न्यायालयापर्यंत गेला. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर त्याचे परिणाम झाले. विशाखा समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवरुन तीन्ही विभागप्रमुखांवर एकाचवेळी कारवाई करण्याची वेळ त्याच्यावर आली. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात काहीसे वाद निर्माण झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.