

Siddharth Murkute case in Shrirampur : श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रवेशद्वारावर तरुण सभासदाला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे पुत्र सिद्धार्थ मुरकुटे यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारेगाव येथील सभासद अर्जुन सुभाष पटारे (वय 25) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
अर्जुन पटारे हे 26 सप्टेंबर रोजी अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुख्य प्रवेशद्वारावर आले होते. त्यावेळी प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या सिद्धार्थ मुरकुटे यांनी सभासद ओळखपत्र दाखवल्याशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितल्याचे पटारे यांनी तक्रार दिली. यानुसार श्रीरामपूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची घेतली आहे.
पटारे यांनी मोबाईलमध्ये आपले सभासद ओळखपत्र दाखवले. मात्र, त्यानंतर सिद्धार्थ मुरकुटे यांनी आपल्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप पटारे यांनी केला आहे. घडलेल्या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला असता, सिद्धार्थ मुरकुटे यांनी हातावर मारल्याने मोबाईल खाली पडला आणि त्याचे नुकसान झाल्याचेही पटारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय, यापूर्वीही आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप अर्जुन पटारे यांनी केला आहे.
पटारे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर (Shrirampur) शहर पोलिसांनी सिद्धार्थ मुरकुटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुख्य हवालदार परदेशी करत आहेत. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकाराची श्रीरामपूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
अशोक कारखान्याची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ताशेरे, आरोप-प्रत्यारोप आणि खडाजंगीने गाजली. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कामगारांचे रखडलेले पगार, प्रदूषणाचा प्रश्न आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावरून सभासदांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. कारखान्याचा तोटा 390 कोटींवर गेला असून कामगारांचे 11 महिन्यांपासून पगार थकीत आहेत. मळीच्या पाण्यामुळे परिसरातील 750 एकर शेती नापीक झाल्याचा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिल्याचा आरोप करत व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला. तोडणी-वाहतूक खर्च 955 रुपयांवर गेल्याने स्थानिक ऊस असताना बाहेरून ऊस आणण्याच्या गणितावरही प्रश्न उपस्थित झाले.
कारखान्याला दिल्ली येथे मिळालेला पुरस्कार आणि तज्ज्ञ संचालकांच्या पात्रतेवरून सभेत गदारोळ झाला. प्रा. कार्लस साठे यांनी पुरस्काराच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केल्याने ज्ञानेश्वर मुरकुटे व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तज्ज्ञ संचालक नीरज मुरकुटे यांच्यावर टीका केल्याने वातावरण तापले होते; मात्र ॲड. अजित काळे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.
आरोप-प्रत्यारोपांनंतरही तालुक्याची ‘कामधेनू’ असलेला अशोक कारखाना बंद पडू नये यासाठी सर्वांचे एकमत झाले. आगामी तीन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीत सभासद योग्य तो कौल देतीलच; मात्र तोपर्यंत कारखाना चालू ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आपला ऊस ‘अशोक’लाच द्यावा, असे आवाहन शेतकरी संघटनेसह मुरकुटे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.