Samajwadi Party News: महाविकास आघाडीच्या सर्वसमावेशक राजकीय धोरणाचा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी अवघ्या दोन जागांवर या पक्षाला समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे अस्तित्वासाठी आता पक्षाचे पदाधिकारीच बंडखोरीच्या मनस्थितीत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 2.13 लाख मतदानात 1.98 लाख मते काँग्रेसच्या पारड्यात टाकणाऱ्या काँग्रेसला मालेगाव मध्य मतदारसंघात झटका बसला आहे. येथे समाजवादी पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या हातून निसटला.
मालेगाव मध्य हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या निवडणुकीत येथे `एमआयएम` पक्षाने येथे बाजी मारली होती. यंदा काँग्रेसचा हा मतदारसंघ समाजवादी पार्टीने घेतला आहे.
समाजवादी पक्षाने सलग सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले समाजवादी नेते (कै) निहाल अहमद यांच्या कन्या शाने-ए-हिंद डिग्निटी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळण्यासाठी काँग्रेसने केलेला हा त्याग त्यांच्याच संकोचाचे कारण बनला आहे.
शहरात यंदा `एमआयएम` पक्षाचे मौलाना मुक्ती अहमद हे पुन्हा एकदा उमेदवारी करणार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख हे गेले वर्षभर विविध राजकीय प्रयोगांमध्ये व्यस्त होते. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला.
या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात त्यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या नावाचे लघुरूप `इस्लाम` असे करण्यात आले. मात्र त्याला शहरातील विविध धार्मिक नेते आणि मौलवी यांनीच आक्षेप घेतल्याने एकाच दिवसात माजी आमदार असिफ शेख यांना आपल्या या पक्षाचे नाव गुंडाळून ठेवावे लागले.
माजी आमदार शेख यांनी आता अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मालेगाव शहराचे यंदाचे राजकारण आणि निवडणूक दोन्हीही अतिशय गुंतागुंतीची बनली आहे. सध्या यंदाच्या निवडणुकीत मालेगाव शहरात तिरंगी लढत होईल असे चित्र आहे.
समाजवादी पक्षाच्या शानेहिंद, एमआयएम चे आमदार मौलाना मुक्ती आणि अपक्ष माजी आमदार आसिफ शेख हे उमेदवार असतील. सध्या तरी मालेगावची सामाजिक रचना आणि मतदारांची विभागणी लक्षात घेता मतविभागणी अटळ आहे.
यामध्ये शहरात उत्तर भारतातून विणकर म्हणून कामासाठी आलेले मतदार `अन्सारी` या वर्गात मोडतात. स्थानिक मुस्लिम समाजाचे मतदार `दखनी` म्हणून ओळखले जातात. सध्या अपक्ष उमेदवार आसिफ शेख दखणी तर आमदार मौलाना मुक्ती आणि समाजवादी पार्टीच्या शानेहिंद हे दोघे अन्सारी मतदारांचे प्रतिनिधी मानले जातात.
अन्सारी मतदारांचे दोन प्रतिनिधी निवडणुकीत असल्याने मतांची विभागणी झाल्यास त्याचा लाभ अप्रत्यक्षरीत्या माजी आमदार शेख यांना होऊ शकतो. या अडाख्यावरच अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार शेख यांनी आपला डाव टाकला आहे. निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला आहे. अशा स्थितीत यापुढे हा प्रचार कोणत्या दिशेने जातो, यावर मालेगाव मध्य मतदारसंघाचे राजकारण निश्चित होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.