Nashik News: नाशिक जिल्ह्यात विविध सत्ता पदे पादाक्रांत केलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत स्व पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले आहे. उमेदवार जाहीर करतात बंडखोरीचे लोन या पक्षात पसरले आहे. त्यामुळे उमेदवारांची झोप उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाने नाशिक जिल्ह्यातील पाच पैकी चार जागांवर विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली. नाशिक मध्य मतदारसंघातील विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना वेटिंग वर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आमदार फरांदे यांच्या स्पर्धकांचे मनोबल वाढले आहे.
चार मतदारसंघात विद्यमान आमदारांना पक्षाने उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र पक्षातील इच्छुकांचा या आमदारांवर विश्वास नाही. जाहीर केलेल्या चार पैकी दोन जागांवर भाजपला बंडखोरांनी मोठे आव्हान दिले आहे.
नाशिक पश्चिम मतदार संघातून माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पक्षाला उमेदवार बदलण्याचे आवाहन केले होते. त्या पाठोपाठ लगेचच त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेत इंजिनवर स्वार होण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत पक्षात प्रवेश केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपच्या दिनकर पाटील यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. आज दिनकर पाटील आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे पश्चिमच्या उमेदवार आमदार हिरे यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी होणारा विरोध आता थेट बंडखोरीत बदलला आहे.
भारतीय जनता पक्षाला चांदवड-देवळा मतदारसंघातही मोठ्या बंडखोरील सामोरे जावे लागत आहेत. या मतदारसंघात नाफेडचे संचालक आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी चांदवड आणि देवळा या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळावे घेतले. त्या पाठोपाठ देवळा येथील भाजपाच्या सतरा नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
नाशिक मध्य मतदारसंघात आमदार फरांदे यांच्या उमेदवारीलाही पक्षातून मोठा विरोध आहे. या ठिकाणी सुरेश पाटील, पक्षाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी आणि माजी नगरसेविका हिमगौरी अडके या तिन्ही इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
स्वतः आमदार फरांदे यादेखील मुंबई ठोकून आहेत. त्यामुळे पक्षापुढे गंभीर पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील याबाबत पक्षाचे नेते चिंतीत आहेत. आज नाशिक मध्य मतदारसंघाचा निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र बंडखोरीच्या भीतीने तो लांबणीवर पडल्याचे इच्छुकांनी सांगितले.
महायुती स्थापन करून राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली. मात्र त्यामुळे आपल्याच आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला. याबाबत यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता त्याचे थेट पडसाद उमटू लागले आहेत.
भाजपपुढे जिल्ह्यातील आपल्या पाच जागा राखण्यासाठी या बंडखोरांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. याशिवाय महायुतीचे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीत कितपत भाजपला मदत करील याविषयी देखील साशंकता आहे. त्यामुळे महायुतीचे पाऊल नाशिक जिल्ह्यात सध्यातरी अनिश्चिततेकडे सरकत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.