Ahilyanagar News : महाविकास आघाडीने अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात उमेदवार निश्चित केले असतानाच, महायुतीचे मात्र तीन जागांवर निर्णय होताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस राहिला असताना, महायुतीकडून तिन्ही जागांवर निर्णय होत नसल्याने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या जागांचा निर्णय महायुतीत प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही जागावेर उमेदवार जाहीर केलेला नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) भाजप आणि शिवसेनेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात थोरात आणि विखे यांच्यात वाद टोकाला पोचला आहे. ही जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाते याची उत्सुकता आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार सुजय विखे इच्छुक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तिथं दौरे वाढवले आहेत. श्रीरामपूर आणि नेवासा मतदारसंघात भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बैठक घेतली. यात नेवासा मतदारसंघासाठी भाजपकडील इच्छुक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची नावं पाठवण्यात आली आहे. या जागेवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे इच्छुक आहेत. त्यामुळे इथला निर्णय प्रलंबित आहे.
श्रीरामपूर मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाईल हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपचे नितीन दिनकर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उमेदवारी देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. परंतु तिथं काँग्रेसकडून उमेदवारी नाकारलेले आमदार लहू कानडे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील धनुष्यबाणासाठी मुंबईत फिल्डिंग लावली आहे. तसंच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने ही जागा आरपीआय मिळावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष मंत्री रामदास आठवले महायुतीकडे पाठपुरावा करत आहेत.
मंत्री रामदास आठवले यांच्या 'आरपीआय' पक्षाचा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील विचार होत नसल्याने त्यांनी महायुतीवर जाहीर नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे श्रीरामपूरचा निर्णय महायुतीत काय होतो, याची उत्सुकता आहे.
भाजप राधाकृष्ण विखे (शिर्डी), भाजप माजी आमदार शिवाजी कर्डिले (राहुरी), भाजप आमदार मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), भाजप प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा), भाजप आमदार प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड), राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर), राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आशुतोष काळे (कोपरगाव), राष्ट्रवादी काँग्रेस आमदार किरण लहामटे (अकोले)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर (अहिल्यानगर शहर), राणी लंके (पारनेर), संदीप वर्पे (कोपरगाव), आमदार रोहित पवार (कर्जत-जामखेड), अमित भांगरे (अकोले), आमदार प्राजक्त तनपुरे (राहुरी), प्रतापराव ढाकणे (शेवगाव-पाथर्डी), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख (नेवासा), अनुराधा नागवडे (श्रीगोंदा), काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्रभावती घोगरे (शिर्डी), हेमंत ओगले (श्रीरामपूर).
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.