Congress Vs Shivsena News: नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा राज्यातील नेत्यांनी सोडवला. मात्र स्थानिकांना तो मानवलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे इच्छुक बाह्या सरसावून मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक मध्य मतदारसंघावरून प्रचंड ओढाताण झाली. अखेर हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आला. आज या पक्षाकडून माजी महापौर वसंत गीते यांसह अन्य उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला.
त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आनंदात आहेत. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसच्या इच्छुकांनी अद्यापही आपली शस्त्रे मान केलेली नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत वेगळे काही घडण्याची चिन्हे आहेत.
या संदर्भात इच्छुक आणि प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी पक्ष हितासाठी व आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे चिन्ह शहरी भागात मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मात्र शहरातील दोन विधानसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे पक्षाला आणि उर्वरित दोन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकचा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात आला होता. दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह मतदारांमध्ये जाणे अत्यावश्यक आहे.
त्या दृष्टीने पक्षाच्या हितासाठी आम्ही उमेदवारी करण्याच्या मनस्थितीत आहोत, असे श्री. दिवे म्हणाले. याबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आग्रही आणि भावनिक झाले आहेत. येत्या दोन दिवसात शहरात काँग्रेस समर्थकांचा एक मेळावा घेण्यात येईल. त्या मेळाव्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येईल.
पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे समजून घ्यावे, अशी आमची अपेक्षा आहे. हा मतदारसंघ कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अद्यापही काँग्रेस पक्षाला मिळावा. यासाठी प्रयत्न करावेत असे माजी नगरसेवक दिवे यांनी सांगितले.
दरम्यान महाविकास आघाडीचे जागावाटप आणि नाशिक मध्य मतदार संघातून माजी महापौर गीते यांना शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्याचे पडसाद काँग्रेसच्या अन्य इच्छुकांमध्ये देखील उमटले आहेत.
डॉ हेमलता पाटील यांनी याबाबत आपली भूमिका समाज माध्यमांवर मांडली आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी मी काँग्रेस पक्षाकडे आग्रह धरला होता. मात्र आता काँग्रेस पक्षाने हा मतदार संघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडला आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मी माझी अपक्ष उमेदवारी करणार आहे. कोणत्याही स्थितीत ही उमेदवारी मागे घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर नाशिक शहरात काँग्रेस पक्षात त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे कदाचित लोकसभा निवडणुकीत झालेला `सांगली पॅटर्न` आता नाशिकमध्ये देखील राबविला जाऊ शकतो.
याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक आज सायंकाळी होणार आहे. त्या दृष्टीने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांना हा असंतोष मिटविण्यासाठी तातडीची पावले टाकावी लागते अशी स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.