राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News: काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर झळकले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात 'भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी झळकवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
तर याआधी अशोक चव्हाण हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केला होता. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सोलापूरच्या अकलूजमध्ये आजच (दि.24 जून) 'भावी मुख्यमंत्री' बॅनर झळकले आहेत. त्यामुळे नाना पटोले, अशोक चव्हाण आणि आता बाळासाहेब थोरातही मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज (दि.24 जून) बाळासाहेब थोरात यांचा श्रीरामपूरमध्ये कार्यकर्ता मेळावा आहे. या निमित्ताने त्यांच्या स्वागतार्ह बेलापूर या ठिकाणी सिद्धिविनायक युवा मंच, भारतीय स्वातंत्र्य सेनानी समिती- बेलापूर, खंडकरी शेतकरी संघटना यांच्यावतीने शुभेच्छा देत गोपाल जोशी या कार्यकर्त्यांच्या छायाचित्रासह बेलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये स्वागताचे हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत.
विशेष म्हणजे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेल्या बॅनरवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे, बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि अपक्ष आमदार सत्यजीत तांबे, त्याचबरोबर माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्त्यांचे छायाचित्र या फ्लेक्सवर झळकताना दिसून येत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून 2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सामील असलेल्या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नावाने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री किंवा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे फ्लेक्स विविध ठिकाणी लावले.
या निमित्ताने हे फ्लेक्स माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. मात्र, प्रत्येक वेळेस फ्लेक्सवर असलेल्या नेत्याने या फ्लेक्सशी आपला संबंध नसल्याचे सांगत या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना असतील, असं सांगत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अजित पवार यांच्या नावानिशी छायाचित्र अनेक ठिकाणी 'भावी मुख्यमंत्री' म्हणून फ्लेक्स लागले गेलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावानेही असेच 'भावी मुख्यमंत्री' म्हणून फ्लेक्स लागले.
शिवसेनेकडूनही कधी उद्धव ठाकरे तर कधी आदित्य ठाकरे यांच्या नावाने 'भावी मुख्यमंत्री' असे फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच नाना पटोले, अशोक चव्हाण या नेत्यांचे फोटो फ्लेक्सवर झळकावत भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे.
दरम्यान, राज्यातील राजकारणात विधानसभेत तब्बल आठ वेळेस आमदार असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नेहमीच शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. मात्र, आता त्यांचेही नाव कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्यावतीने भावी मुख्यमंत्री म्हणून आता झळकवल्याने एक नवीन विषय चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.