Ahmednagar District News : समन्यायी कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणाला नगर जिल्ह्यातून मुळा आणि निळवंडे धरणाचे पाणी द्यावे लागणार आहे. मात्र समन्यायी कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान श्रीरामपूर तालुक्याचे होत असल्याने या कायद्याला जबाबदार आणि तरीही धरणाच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या थोरात-विखेंवर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पुन्हा एकदा अस्त्र उपसले आहे.
तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी, ज्यांनी तालुक्याचे पाणी घालवून वाटोळे केले त्यांच्या कारखान्यांना ऊस देवू नका असे आवाहन केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय ''अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. ती टिकली तरच तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी टिकतील. तेंव्हा ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप करुन तालुक्याच्या पाण्यावर संक्रांत आणली तसेच निळवंडेचे पाणी आपल्या भागात पळविले अशा वरच्या भागातील नेत्यांच्या कारखान्यांना ऊस देवू नका.'' असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.
हे आवाहन करताना मुरकुटे म्हणाले की, ''वरच्या भागातील नेत्यांना सत्तेची मस्ती चढली आहे.सत्तेच्या जोरावर दंडेलशाही करुन ते 'अशोक'च्या कार्यक्षेञातील ऊस पळवित आहेत.वरच्या नेत्यांनी समन्यायी पाणी वाटपाचा कायदा करुन आपल्या भागाची संजीवनी असलेल्या भंडारदरा धरणाचे पाणी घालविले. निळवंडेचे ८.५ टी.एम.सी.पाणीही त्यांच्या भागासाठी पळविले.''
तसेच ''निळवंडेचा संगमनेर व राहाता या तालुक्यांनाच लाभ आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा व दिघी या दोनच गावांना थोडासा लाभ होणार आहे. तेव्हा ज्यांनी आपल्या भागाचे पाण्याचे तीन तेरा वाजविले त्यांना साथ देवू नये.'' असे मुरकुटे यांनी सांगितले.
याशिवाय ''अशोक कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देतो. ऊसाच्या तोडीत वशिलेबाजी केली जात नाही.अशोक कारखाना ही तालुक्याची एकमेव कामधेनू आहे. ती स्वतःच्या कारखान्यांना ऊस उपलब्ध व्हावा याहेतूने सत्तेच्या जोरावर बंद पाडण्याचा वरच्या नेत्यांचा इरादा आहे. तो सफल होवू देवू नये.'' असे त्यांनी म्हटले
याचबरोबर ''अशोक कारखान्यावर तालुक्याचे अर्थकारण अवलंबून आहे. तसेच श्रीरामपूरसह तालुक्यातील बाजारपेठा अशोक कारखान्यामुळे टिकल्या आहेत. हे सर्व ध्यानात घेता तालुक्यातील कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरच्या भागातील नेत्यांच्या अमिषाला बळी पडून ऊस देवू नये.'' असे आवाहनही मुरकुटे यांनी केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.