Ahmednagar News : श्रीरामपूर मधील अशोक सहकारी कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी भाजपचे जेष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर तोफ डागली आहे. "मंत्री विखे यांना निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी ऊसाच्या दरवाढीची घोषणा केली", असा सनसनाटी आरोप माजी आमदार मुरकुटे यांनी केला.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील बेकायदेशीर कामकाजावर देखील तोफ लागली. "जिल्हा बँकेकडून बेकायदा कर्ज घेतले. सत्ता असल्यामुळे पैसे घ्यायचे आणि ते निवडून येण्यासाठी उधळायचे. गणेश कारखान्यात झालेला पराभव व मुलाचा लोकसभेतील पराभवामुळे विखे घाबरलेले आहेत. त्यामुळे निवडून येण्यासाठी प्रवरेची ऐपत नसताना सभासदांना तीन हजार रूपये दिले. आता परत 200 रूपये देणार आहे", असे भानुदास मुरकुटे यांनी म्हटले.
अशोक कारखान्याची 66 वी सर्वसाधारण सभेचे कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपाध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, संचालक कोंडिराम उंडे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, प्राचार्य डाॅ.सुनिता गायकवाड, डाॅ.वंदना मुरकुटे उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, "प्रवरेची खरी परिस्थिती माहिती नसताना तुलना कशासाठी? ज्या प्रवरेला 2020-21 मध्ये 170 कोटी तोटा होता, तोच कारखाना 2021-22 मध्ये 30 कोटी नफ्यात कसा आला? साखर कारखान्याला एका वर्षात 200 कोटी नफा कसा होवू शकतो? ते महसूलमंत्री काहीही करू शकतात. त्यांचा काटा तपासायला कोण जाणार". प्रवरेत गॅमन कंपनीचा को-जनरेशन प्रकल्प होता.
मात्र, ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याने सेंट्रल बँकेकडून लिलावात प्रवरेने हा प्रकल्प विकत घेतला. त्याचे कर्ज प्रवरा बँकेकडे वळविले. त्यानंतर जिल्हा बँकेकडून 70 कोटींचे कर्ज घेतले. त्यातून ही पतपैशाची उधळपट्टी सुरू आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार मुरकुटे यांनी केला.
"प्रवरा काही आदर्श कारखाना नाही. संजीवनी, कोळपेवाडी आणि प्रवरा हे दारू तयार करणारे कारखाने असल्याने त्यांची बरोबरी आम्ही करू शकत नाही. तुलनाच करायची असल्यास मुळा, ज्ञानेश्वरबरोबर करा. साखरेच्या उत्पादनात नुकसान आहे. मात्र, दारूपासून जास्त पैसे मिळत असल्याने ते कधीही जादा भाव देवू शकतात", असेही मुरकुटे यांनी म्हटले.
शिक्षण संस्थेविषयी बोलताना भानुदास मुरकुटे म्हणाले, "गोविंदराव आदिक, राधाकृष्ण विखे यांनी कारखान्याच्या असलेल्या शिक्षण संस्था आपल्या स्वकीयांच्या आणि स्वतःच्या नावावर करून घेतल्या. आपण मात्र, तसे केले नसून आपल्या संस्था या कारखान्याच्याच मालकीच्या आहेत. त्यामुळे त्यावर झालेला खर्च हा कर्ज नाही. त्यांना जागा व इमारत बांधून देतो, त्यावर मालकी हक्क मात्र कारखान्याचा असल्याने त्यांना जागा देण्यास विरोध असण्याचे कारण नाही".
कारखाना निवडणुकीत विरोधात निवडणूक लढविणाऱ्यांना सभासद केले. हे प्रवरा, संगमनेरमध्ये होईल का? असा सवाल करत हे फक्त अशोक कारखाना भानुदास मुरकुटे व संचालकच करू शकतात. आम्ही भेदभाव करत नाही. त्यामुळे लोकांची दिशाभूल करू नका, असे सांगत त्यांनी सून वंदना मुरकुटे यांना शालजोडीतून कानपिचक्या देताना भानुदास मुरकुटे यांनी आजवर केलेल्या मदतीचा लेखाजोखाच सर्वांसमोर मांडला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.