
Kunal Patil BJP entry : तब्बल 75 वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याने भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित करण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील चित्रकुट बंगल्यावर पाच दिवसांपूर्वी एक बैठक झाली. या बैठकीसाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजपच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आलं होतं. कुणाल पाटील यांना पक्षात घेण्याबाबत सगळ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्थानिक भाजपच्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने उत्तर महाराष्ट्रात मोठं इन्कमिंग सुरु केलं आहे. विरोधी पक्षातील मोठ मोठे नेते भाजप गळाला लावत आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिकमधील उबाठाचे नेते सुधाकर बडगुजर यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध होऊनही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पक्षात प्रवेश दिला. मात्र त्यावेळी भाजपकडून एक मोठी चूक घडली. ती चूक सुधारण्यासाठी भाजपने कुणाल पाटील यांच्याबाबतीत काळजी घेतली आहे.
बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा विरोध होता. नाशिकच्या स्थानिक भाजपच्या तिन्ही आमदारांमध्ये त्यावरुन अस्वस्थता निर्माण झाली होती. स्थानिक आमदारांनी तो विषय प्रतिष्ठेचा करुनही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना विश्वासात न घेता बडगुजर यांच्यासाठी पक्षात रेड कार्पेट टाकलं. त्यावरुन नाशिकमध्ये मोठा धिंगाणा झाला. सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यांनी 14 माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बडगुजर यांचा प्रवेश रोखावा अशी विनंती केली.
त्यानंतर गिरीश महाजन यांनी सर्व आमदारांना तंबी देत गप्प केलं. कोणत्याही परिस्थिती नाशिक महापालिका निवडणूक जिंकायची आहे या इराद्याने स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बडगुजर यांचा प्रवेश घडवून आणला. केवळ स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता इतका मोठा संघर्ष नाशिकमध्ये उफाळला. आता तीच चूक कुणाल पाटील यांना पक्षात घेताना होऊ नये म्हणून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी धुळ्यातील भाजपच्या सर्व स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच कुणाल पाटील यांचा प्रवेश निश्चित केला आहे.
बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह , माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार राम भदाणे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, उद्योजक निखिल देवरे, प्रा. अरविंद जाधव, बाळासाहेब भदाणे, भाऊसाहेब देसले, बबन चौधरी, आशुतोष पाटील, डॉ. दिनेश माळी, प्रवीण पवार आदी उपस्थित होते. मंत्री बावनकुळे यांनी कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत उपस्थितांशी चर्चा करत त्यांची भावना जाणून घेतली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत धुळे ग्रामीणमधील उमेदवारांची निवड यासह मतदारसंघातील निरनिराळ्या विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत कुणाल पाटील यांना पक्षात घेतो आहोत, त्यासंदर्भात कुणाला काही अडचण तर नाही ना अशी विचारणा झाली. त्यावेळी सर्वांनी सांगितलं की पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. परंतु जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत जागा वाटप करताना कुणाल पाटील यांच्या फेवरमधील लोकांना तिकीट द्याल की भाजपच्या असा सवाल सर्वांनी उपस्थित केला. त्यावर सामंजस्याने मार्ग काढू असा शब्द बावनकुळे यांनी स्थानिक भाजपच्या नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.