
Sudhakar Badgujar : ठाकरे शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे बडगुजर यांचा सर्वांधिक संघर्ष भाजपसोबतच राहिला आहे.
२०२३ मध्ये भाजपने बडगुजर यांच्यावर दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंध असल्याचा कथित आरोप केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यावेळी भाजपनेच बडगुजर यांना टार्गेट केलं होतं. त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल असून त्यांना पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशी साद पक्षाचेच आमदार घालत असताना भाजपच्या वरिष्ठांकडून मात्र बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत.
बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला पश्चिम विधानसभा मतदारसंघांच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे. सीमा हिरे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र सीमा हिरे यांच्या सर्व आरोपांना केराची टोपली दाखवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांना पक्षात रेड कार्पेट टाकलं आहे. आरोप केल्याने काय होते, ते सिद्ध थोडीच झाले आहेत अशी भूमिका घेत बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सीग्नल दिला आहे. त्यामुळे आमदार सीमा हिरे यांना हिणावल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सोमवारी बडगुजर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुधाकर बडगुजर हे लवकरच भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. २०१७ मध्ये भाजपाने दमदार कामगिरी करीत नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवली होती. शिवाय शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. तरीही भाजपला आपल्याच आमदारांना व कार्यकर्त्यांना दुखवून बडगुजर यांना पक्षात का घ्यायचं आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
भाजपाने आपला पूर्ण फोकस हा आगामी नाशिक महापालिका निवडणुकीवर ठेवला आहे. कोणत्याही परिस्थिती भाजपला नाशिक मनपात पुन्हा सत्ता आणायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नेते कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घ्या असा मंत्रच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला आहे.
सुधाकर बडगुजर राज्यपातळीवर नेतृत्व नसले तरी ते स्थानिक पातळीवरील एक प्रभावी नेतृत्व आहे. नाशिकच्या राजकारणात त्यांचा चांगला दबदबा आहे. त्यांच्याकडे असलेले आर्थिक बळ व स्थानिक राजकीय यंत्रणेवर असलेले मजबूत पकड ही भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे भाजप बडगुजर यांना आपल्या पक्षात घेण्यास उतावीळ झाले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते.
बडगुजर यांच्या भाजपप्रवेशासंदर्भातील संपूर्ण जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जरी बडगुजर यांना विरोध होत असला तरी व्यापक राजकीय फायदे लक्षात घेऊन याविषयावर महाजन विचार करत आहेत. प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्हीही त्याच दृष्टीने प्रयत्न करत आहोत. असे महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यासंदर्भात बडगुजर यांची कालपर्यंत काही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. मात्र आता बडगुजर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्ते आणि समर्थकांशी बोलून निर्णय घेणार आहे. मात्र, पक्षात प्रवेश करताना मी कोणत्याही अटी ठेवणार नाही असं बडगुजर यांनी म्हटलं आहे. सीमा हिरे यांच्याविरोधात मी निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. सर्व पक्षातून बोलवणं आहे, कुठं जायचं ते ठरवू असं बडगुजर यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.