डॉ. राहुल रनाळकर
नाशिक : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महिंद्रचा इलेक्ट्रिकलचा (Mahindra) नाशिकमध्ये (Nashik) प्रस्ताविक असलेला दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प पुण्याला (Pune) हलवित असल्याची घोषणा केली. त्यानंतर ‘आपलेच दात आपलेच ओठ’, अशी भाजपची (BJP) स्थिती झाली. आधीच पालकमंत्रिपद हिरावून नेल्याच्या मनःस्थितीमुळे भाजपची पुढची वाटचाल नेमकी कशी राहील, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. (Nashik BJP found himselfin a dilemma on Mahindra Project)
भाजपची नाशिकमधील स्थिती दोलायमान झालेली दिसून येते. महत्त्वाच्या प्रश्नांवर नेमकी भूमिका काय असली पाहिजे, हे ठरविण्यासाठी भाजपची कोंडी होत असावी. राज्य सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गट अर्थात शिवसेना आहे. पालकमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत नाशिकच्या विकासासाठी कोणती भूमिका घ्यावी, हे भाजपला बहुधा वेळीच उमगत नसावे.
नाशिक भाजप सध्या कमालीच्या बॅकफूटवर दिसून येत आहे. एक मोठे हिंदी भाषिक नेते एका खासगी चर्चेत म्हणाले, ‘नाशिक भाजप को साप सूंघ गया है क्या...’ त्यांची ही एका वाक्यातील टिप्पणी सध्याच्या परिस्थितीला अचूक लागू पडते.
महिंद्र इलेक्ट्रिकलचा दहा हजार कोटी रुपयांचा नाशिकला घोषित झालेला प्रकल्प अचानक पुण्याला नेला जातो, ही बाब तशी कळेनाशी आणि सध्याच्या नेत्यांबद्दल संभ्रम निर्माण करणारी आहे. गेल्या अनेक वर्षांत नाशिकमध्ये मोठा प्रकल्प आलेला नाही. स्थानिक युवकांना नोकरीसाठी वणवण भटकावं लागत आहे.
ज्या प्रकल्पावर आशा लागून होत्या, असा प्रकल्प पुण्याकडे हलविला जातो. बरं, या सगळ्या विषयावर भाजपकडून काहीही कारवाई होत नाही, की विरोधाचा एक शब्द देखील येत नाही. त्यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनाच नाशिकबद्दलची कळकळ आहे की काय? असं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
शहरातील तिघा भाजपच्या आमदारांनी या विषयावर कोणतीही भूमिका घेतली नाही. विशेष म्हणजे, पालकमंत्री दादा भुसे यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना देखील विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते.
गेल्या अनेक वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून निघण्याची नाशिककर आतुरतेनं वाट पाहत आहेत. घोषणा अनेक प्रकल्पांची झाली. पण प्रत्यक्षात हे प्रकल्प साकारण्यासाठीची गती अतिशय संथ आहे. विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कच्या केवळ गप्पा ठरू नयेत, अशी आशा नाशिककर बाळगून आहेत. नाशिक-पुणे रेल्वेच्या कामाला गती नाही. मेट्रोचं घोडं अधांतरी लटकलेल्या स्थितीत आहे.
रामतीर्थाचा विकास तर अद्याप केवळ दिवास्वप्न आहे. खरंतर नाशिकसाठी यापुढे विकासाचं राजकारण व्हायला हवं. लोकांनाही विकासाचं राजकारण पसंत पडतं. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि वातावरण कलुषित करणाऱ्या वक्तव्यांना लोक कंटाळले आहेत. नाशिकचे आम्हीच नेते आहोत, असे म्हणणाऱ्यांना लोकप्रतिनिधींना नाशिकमधून दहा हजार कोटींचा प्रकल्प बाहेर जाणं, ही मोठी चपराक आहे.
रोजगार मेळाव्यांचा घाट सध्या घातला जात आहे. त्या माध्यमातून तरुणांना रोजगार काही प्रमाणात उपलब्ध होत देखील असेल. पण ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हातांना थेट काम मिळू शकेल, असे मोठे प्रकल्प डोळ्यांदेखत पळविले जात आहेत. त्यामुळे राजकारणाच्या मैदानात हा मुद्दा पुढच्या काळात तीव्र होण्याची शक्यता आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी काहीही प्रतिक्रिया न देणं जसं काही घडलेलंच नाही, हे सर्वथा चूक मानायला हवं. भांडणं, मारामाऱ्या या होत राहतील, पण नाशिकच्या हितासाठी खरंच कोण लक्ष घालतंय, हे जनता लक्षात ठेवते. विशेष म्हणजे, वेदांता फॉक्सचा प्रोजेक्ट गुजरातला हलविण्यात आल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आता नाशिकच्या संदर्भात विकास प्रकल्पांवरून प्रादेशिक वाद घडू पाहतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.