Ahmednagar News : भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या वाळूचोरीच्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी पत्रकार परिषद घेत खुलासा करत, शेवगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक विलास पुजारी यांच्यावर गंभीर आरोप केले.
तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि जबाब देणाऱ्या सरपंचांनी पदाचा गैरवापर करत, खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुजारी यांना निलंबित करून 'एसआयटी'मार्फत आणि खोटा जबाब देणाऱ्या सरपंचाविरुद्ध पदाचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय पोलिस निरीक्षकाच्या दडपशाहीविरोधात सोमवारी (ता. 4) सर्वपक्षीय मोर्चा काढून कारवाईची मागणी करणार असल्याचेही मुंढे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची उचलबांगडी करत शुक्रवारी रात्री नियंत्रण कक्षात बदली केली. त्यांच्या जागी आता दिगंबर भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अरुण मुंढे(Arun Mundhe) आणि त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्याविरोधात शेवगाव तहसीलदार कार्यालयामार्फत 24 नोव्हेंबरला वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र मुंढे बंधूंचा वाळूचोरीचा कुठलाही संबंध नसताना हा गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत, या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन दिले आणि चौकशीची मागणी केली.
यानंतर पहिल्यादांच मुंढे यांनी माध्यमांसमोर येत आज पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. तत्कालीन पोलिस निरीक्षक विलास पुजारी आणि खोटा जबाब देणारे सरपंच यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी केली.
अरुण मुंढे म्हणाले, "माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. वाळू चोरी कोणी, कधी आणि कोठून केली, हेसुद्धा माहीत नाही. मंडलाधिकारी यांनी वाळूचोरीची फिर्याद दिली आहे. मात्र, फिर्यादी मंडलाधिकारी यांनी तहसीलदारांकडे त्यांचा अहवाल सादर केला. तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी माझ्यावर दबाव आणून हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा रिपोर्ट दिला आहे. या मंडलाधिकाऱ्यांना मी कधीही भेटलेलो नाही. त्यांनी त्यांच्याच मनाने हा रिपोर्ट सादर केला आहे".
याशिवाय ''दोन वर्षांपासून विलास पुजारी हा शेवगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याच्या काळात शेवगावमध्ये मोठी जातीय दंगल झाली. या दंगलीत अनेक निर्दोषांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मी सातत्याने पोलिस अधीक्षकांसह सरकारकडे तक्रार करत होतो. याचा मनात राग धरून माझ्याविरोधात कट कारस्थान रचून हा खोटा गुन्हा दाखल केल,'' असा आरोपही मुंढे यांनी केला.
याचबरोबर, ''शेवगावमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली दंगल ही शेवगावच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी घडवून आणली. यामधून त्यांनी कोट्यवधींची माया जमा केली. त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. प्रशिक्षणार्थी आयपीएस रेड्डी हे शेवगावमधून बदलून गेल्यानंतर अवैध धंदेवाल्यांची बैठक बोलावून तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी सर्व अवैध धंदे पुन्हा चालू केले.'' असा आरोपही मुंढे यांनी केला.
तसेच, ''यातून शेवगावच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. याबाबत वारंवार तक्रारी केल्या. मात्र शेवगाव तालुक्यातील जनतेला अनेक खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचे षडयंत्र तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.'' असा गंभीर आरोपही यावेळी अरुण मुंढे यांनी शेवगाव पोलीस निरीक्षक यांच्यावर केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.