Solapur News : राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन चार महिने झाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आतून एकच आहेत, असा गैरसमज पसरविला जात आहे. मात्र, कर्जत (जि. रायगड) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात उपमुख्यमंत्री पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची सुरुवातीपासूनची भूमिका ठळकपणे मांडली. त्यामुळे सामान्यांसह पक्ष कार्यकर्त्यांमधील हा गैरसमज अजित पवार यांनी पुसून काढला आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले. (Ajit Pawar cleared the misconception that Pawar is one and same in the Karjat shibir)
उमेश पाटील म्हणाले की, शब्द पाळणारे नेते, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री पवार जे बोलतात, ते नेहमी खरंच बोलतात असा अनुभव महाराष्ट्राने आजपर्यंत घेतलेला आहे. शरद पवार यांच्या संमतीने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिलेला शब्द अजित पवार यांनी पाळला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार यांना आम्ही पूर्वीही नेते मानत होतो, आताही नेते मानत आहोत. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा किंवा त्यांच्या पुरोगामित्वाबद्दल कोणीही संशय घेऊ शकत नाही. आम्ही अजित पवारांच्या माध्यमातून भाजपसोबत सत्तेत गेलो असलो तरीही आम्ही आमचे पुरोगामित्व सोडले नाही, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
देशाच्या राजकारणात आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी मुख्यमंत्री जयललिता, मायावती, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, जॉर्ज फर्नांडिस या दिग्गज नेत्यांनीही एकेकाळी भाजपला साथ दिलेली आहे आणि भाजपची साथ घेतली. हे नेते भाजपसोबत गेले म्हणजे त्यांनी त्यांची विचारधारा सोडली का?, या नेत्यांनी त्यांची विचारधारा शेवटपर्यंत जपली होती. आम्हीही भाजपसोबत गेलो असलो तरी आम्ही आमची विचारधारा कायम ठेवल्याचे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने भाजपसोबत जावे, यासाठी २००४ पासून प्रयत्न झाले आहेत. त्यानंतर २०१४, २०१६, २०१९ मध्येही या संदर्भात प्रयत्न झाले होते. शरद पवार यांनी आयत्या वेळी ‘यू-टर्न’ घेतल्याने हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी २०१९ मध्ये घेतलेला पहाटेचा शपथविधी हादेखील त्याचाच एक भाग असल्याचेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.