

Shrirampur Water Crisis : श्रीरामपूर शहरात पाण्यासाठी उपोषण, आंदोलने आणि होमहवन सुरू असताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उपरोधिक भाष्य केले.
‘तुमच्या उपोषणाने पाऊस पडत असेल तर बसा, भाषणाने पाऊस पडत असेल तर भाषणे करा आणि तुमच्या होमहवनाने धरणाचे दरवाजे उघडून पाणी मिळत असेल तर हवन करा,’ असा टोला त्यांनी लगावला. मात्र, पाणीवाटपाचा निर्णय घेताना एक चूक संपूर्ण तालुक्याला पुढील बारा महिने पाण्यापासून वंचित ठेवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
अहिल्यानगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विकास आघाडीच्यावतीने मतदार संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला काँग्रेस आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, वैभव पिचड, नवनिर्वाचित संचालक रणजित देशमुख, काँग्रेस नगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, सचिन जगताप, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.
श्रीरामपूरच्या (Shrirampur) पाणीप्रश्नावर तडजोडीचा काही मार्ग निघू शकतो का, यावर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, की व्यक्तिगत विचाराल तर या प्रश्नावर तोडगा निघणे अवघड नव्हे, तर अशक्य आहे. उपोषण, आंदोलने, भाषणे किंवा होम-हवन यांमुळे पावसाचे अथवा धरणातील पाण्याचे गणित बदलणार नाही. प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतील.
पाणीवाटपाचा निर्णय केवळ श्रीरामपूर शहराचा विचार करून घेता येणार नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी संपूर्ण तालुक्याच्या पाणीवाटपाचा विचार करण्याची गरज व्यक्त केली. घाईगडबडीत घेतलेला एक चुकीचा निर्णय तालुक्याला पुढील बारा महिने पाण्यापासून वंचित ठेवू शकतो. त्यामुळे भावनिक भूमिका घेण्याऐवजी उपलब्ध जलसाठा आणि प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय करणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
आमदार हेमंत ओगले यांनी सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी सहकार विकास आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या वेळी संगीता वाघ, गणपतराव सांगळे, कारभारी जावळे, संजय फंड, बाबासाहेब दिघे, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, कांचन सानप, दीपक पटारे यांच्यासह सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.