Jalgaon News : ‘राज्यात शिवसेना फुटली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. सर्व पक्षांचे तीन तेरा वाजले आहेत, त्यामुळे आता आपण एकत्रित होऊन कार्य केले तर आपण काहीही करू शकतो,’ असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजप कार्यकर्त्यासमोर व्यक्त केले. (BJP workers meet Minister Girish Mahajan)
पाचोरा येथील अमोल शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज तसेच कार्यकर्त्यांनी जामनेर येथे जाऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना महाजन यांनी इतर पक्षाबाबत आपली मते नोंदविली आहेत.
ग्रामविकास मंत्री महाजन म्हणाले की, राज्यात सर्व पक्षांचे तीन तेरा आणि बारा वाजलेले आहेत. सगळेच आपल्याला येऊन मिळालेले आहेत. राज्यात जर बघितले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मोजकेच पाच ते सात आमदार आहेत. इतर सर्व आपल्या बाजूने आलेले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही फुटलेली आहे, त्यांच्या सोबतही केवळ आठ ते दहा आमदार आहेत.
आता सर्वच पक्षातील लोक आपल्याला येऊन मिळत आहेत. सर्वच पक्षांची अवस्था एकदम वाईट आहे, त्यामुळे या लोकांना आपले भविष्य कळत असल्याने ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाकडे येत आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात कोणताही पर्याय नाही. राहुल गांधी काय पर्याय होऊ शकतात काय? त्याचे उत्तर नाही असेच असेल.
आज कुठे राहुल गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी. संपूर्ण देश आज मोदी यांच्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजप ३२५ किंवा त्यापेक्षा अधिक ३५० जागा जिंकेल, असा विश्वास आहे. राज्यात कोणाचेही सरकार असले तरी लोक म्हणतात आम्हाला देशात केंद्रात मोदीच पाहिजेत. तेच देशाला सुपर पॉवर बनवू शकतात, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.