Mumbai News : मी ज्यांना शिवसेनेत आणले आणि शिवसेनेकडून तीनवेळा खासदार झाले त्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात मी शिरूरमधून निवडणूक लढविणार आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात दोनदा विधानसभा निवडणूक लढून जेरीस आणले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मी शिरूर लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. आता फक्त मातोश्रीच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा संघटक अॅड. अविनाश रहाणे यांनी आढळरावांना खुले आव्हान दिले आहे. (Adv. Avinash Rahane will contest Shirur Lok Sabha election)
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात १९९९ मध्ये १६ हजारांच्या फरकाने पराभूत झालेले तत्कालीन जिल्हाप्रमुख अॅड.अविनाश रहाणे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार पक्षबांधणी केली आहे. शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेत घेण्यापासून खेड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देणे, शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या खेड लोकसभा मतदार संघातील सभांचे नियोजनही अॅड. रहाणे यांनी केले होते. लोकसभेच्या २००४, २००९ आणि २०१४ या तीनही निवडणुकीत अॅड. रहाणे हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे प्रचारप्रमुख होते.
शिवसेनेत सव्वा वर्षापूर्वी मोठे बंड होऊनही अॅड. रहाणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केले. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ते पुणे जिल्हा संघटक आहेत. ‘सरकारनामा’शी बोलताना अॅड. रहाणे म्हणाले की, माझा आक्रमक व प्रामाणिक शिवसैनिक असा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे. मी फक्त शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच माझी निष्ठा ठेवून आजपर्यंत जगत आलो आहे. त्यामुळे ज्यांनी शिवसेनेकडून लोकसभेत जाण्याची तीन वेळा संधी मिळविली, त्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात मी उभा राहणार आहे आणि जिंकणारही आहे. ‘मला फक्त आता उद्धव ठाकरेंनी फक्त लढ म्हणावं एवढंच....’
आढावा बैठकीत संकेत मिळतील
शिरूर लोकसभा मतदार संघासाठी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आढावा बैठक घेणार आहेत. मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे. आजच्या बैठकीत मला माझ्या संभाव्य उमेदवारीबाबत संकेत मिळतील आणि आदेशही मिळतील, अशी आशा आहे, असेही रहाणे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.