भाजप कार्यकर्ते म्हणतात,`आम्हाला उमेदवारी मिळेल की नाही`

सततच्या इनकमिंगमुळे तळोदा पालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये तिकिटासाठी संघर्ष अटळ
BJP Symbol Lotus
BJP Symbol LotusSarkarnama

सम्राट महाजन

तळोदा : इतर पक्षांतून (Other parties) सत्ताधारी भाजपत होत असलेले जोरदार इनकमिंग व त्यांना देण्यात येत असलेली आश्वासने (Assurance) यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपत मेहनत घेणाऱ्या व येणाऱ्या निवडणुकीत (Local body elections) उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तळोदा (Taloda city) पालिकेच्या पुढील निवडणुकीत भाजपमध्ये (BJP) तिकिटासाठी संघर्ष अटळ आहे, असे म्हटले जात आहे. (Whether Bjp workers will get candidature or not)

BJP Symbol Lotus
अब्दुल सत्तारांची अवस्था पाहून अन्य मंत्री धास्तावले?

प्रत्येक पक्ष हे इतर पक्षांतील बलाढ्य व जिंकण्याचे मेरिट असलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढत पक्ष बळकट करीत असतात. तळोदा पालिकेची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला आपापल्या परीने लागले आहेत. राज्यात सत्तांतर होत भाजपची व शिंदे गटाची सत्ता स्थापन होण्याचा फायदा भाजपला तळोद्यात होत आहे.

BJP Symbol Lotus
एकनाथ शिंदे गटाला भाजपने दिले थेट आव्हान

मागील काळात बॅकफूटवर असलेल्या भाजपकडे येथील इतर पक्षांतील नेतेमंडळी आकर्षित होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले तथा विद्यमान नगरसेवक गौरव वाणी, काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा रत्नाताई चौधरी यांचे पती विद्यमान नगरसेवक सुभाष चौधरी, राष्ट्रवादीचे भरत चौधरी, युवा सेनेचे देवा कलाल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपत प्रवेश केला आहे. तसेच इतर पक्षांतील आणखी काही मातब्बर नेतेमंडळी येत्या काळात भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र हीच इनकमिंग भविष्यात भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

तळोदा पालिकेच्या मागच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारत, पुढील निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देत, त्या वेळी त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. तसेच सध्या केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आता येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत तिकिटाची अपेक्षा आहे. तसेच अनेकांनी त्यादृष्टीने आपापल्या परिसरात तयारीदेखील चालवली आहे. मात्र इतर पक्षांतून भाजपत होत असलेल्या जोरदार इनकमिंगमुळे ऐनवेळी आपले तिकीट कापले तर जाणार नाही ना, अशी भीती अनेकांना सतावत आहे. त्यामुळेच भाजपकडून तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व इतर पक्षांतून भाजपत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तिकिटासाठी संघर्ष होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वेळप्रसंगी भाजपचे हे इच्छुक कार्यकर्ते पक्षांतर करीत, इतर पक्षाकडून उमेदवारी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोषक वातावरण करतेय आकर्षित

केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत, तसेच खासदार डॉ. हीना गावित भाजपच्या, स्थानिक आमदार राजेश पाडवी भाजपचेच, इतकेच काय तर काही महिन्यांपूर्वी आमदार विजयकुमार गावित यांची राज्याचे आदिवासी विकासमंत्री म्हणून वर्णी लागली असून, नुकतीच जिल्हा परिषददेखील भाजपच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे भाजपसाठी सर्वच बाजूने पोषक वातावरण असून, हेच पोषक वातावरण इतर पक्षांतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना भाजपकडे आकर्षित करीत असल्याचे बोलले जात आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com