
Chandu Chavan arrest : नियंत्रण रेषा ओलांडून चंदू चव्हाण पाकिस्तानात गेला होता. तब्बल चार महिने तो पाकिस्तानच्या ताब्यात होता. त्यानंतर भारतीय सरकारने प्रयत्न करुन त्याची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका केली होती. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने त्याला ८९ दिवसांची शिक्षा सुनावली होती. त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं होतं.
सप्टेंबर २०१६ उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर लक्ष्य साधून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याचवेळी भारतीय सैन्य दलातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण हा सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला होता.
भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आल्याच्या रागातून चंदू चव्हाण याने युट्यूब चॅनल सुरु करुन भारतीय सैन्यदलाचीच बदनामी करण्यास सुरुवात केली. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करणं, भारतीय सैन्य दलातील जवानांमध्ये बंड घडवून आणण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी त्याच्याविरोधात नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसांत ठाण्यात मे महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अखेर चंदू चव्हाणला पोलिसांनी अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांच्या शोध पथकाने गुरुवारी (ता. १०) धुळे येथील मोहाडी पोलिस ठाण्यातून अटक केली. रात्री दहा वाजता त्याला देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आणण्यात आलं.
आपल्याला मारहाण झाल्या प्रकरणी तक्रार देण्यासाठी चंदू चव्हाण मोहाडी पोलिस ठाण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी त्यास बसवून ठेवलं. तोपर्यंत इकडे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले व त्याला ताब्यात घेतलं.
चंदू चव्हाण हा मुळचा धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवासी आहे. आर्टिलरी वर्कशॉपचे नायब सुभेदार सचिन गंगाधर गुंजाळ यांनी चंदू चव्हाण याच्या विरोधात फिर्यादी दिली होती. या तक्रारीनुसार चंदू चव्हाण यास सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षभरापासून चंदू चव्हाण हा समाज माध्यमात भारतीय सैन्य दलाबाबत खोटी व बदनामीकारक चित्रफिती प्रसारित करीत आहे. यासंबधी काही व्हडीओ देखील गुंजाळ यांनी पोलिसांना दाखवले होते.
त्याने स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करत त्यावर व्हिडीओ बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी केली. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करण्यास आपण नकार दिल्याने आपल्याला बडतर्फ करण्यात आल्याचे कारण पुढे करत आपल्यावर चुकीची कारवाई केल्याचा दावा त्याने केला.
सैनिकांना वरिष्ठांविरोधात भडाकून त्यांच्यावर हमला करण्यासही त्याने चिथावणी दिली. सैन्य दलाचा गणवेश परिधान करुन भीक मागणे, तसेच व्हिडीओ मधून पालकांना आपल्या मुलांना सैन्यात भरती न करण्याचे आवाहन त्याने केले. शहीद जवानांच्या कुटुंबीयावर अन्याय होतो अशी चुकीची माहिती त्याने लोकांना दिली. त्यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.