
Maharashtra Politics | राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांना सोडून अजित पवारांसोबत आलेल्या छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात वरिष्ठ असूनही मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. तेव्हापासून छगन भुजबळ यांचे नाराजी नाट्य सुरु झालं. 'जहॉं नही चैना, वहा नही रहना'असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, भुजबळांनी त्यानंतर तशी कोणतीही भूमिका अद्याप घेतली नाही.
मात्र आता भुजबळांकडून शरद पवारांसाठी खास भेट पाठवण्यात आल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात भुजबळांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महात्मा फुले यांच्या जयतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांची भेट झाली. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंवर आधारीत दोन पुस्तके सुप्रिया सुळे यांना भेट दिली. व ही पुस्तके त्यांनी शरद पवार साहेबांना द्या म्हणून सांगितले. याच प्रसंगानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भुजबळांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
त्याचवेळी छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हे दोन्ही नेते आपल्याला आदरस्थानी असल्याचं म्हटलं होतं. मला शरद पवारांसारखा नेता मिळाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळ्याल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळे अजित पवारांवर नाराज असलेल्या भुजबळांची पावलं कुठेतरी पुन्हा स्वगृही अर्थात शरद पवार यांच्या गटात परतण्याच्या दिशेने पडताय की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ हे मंत्रीपद न मिळाल्याने आधीच अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी याआधीही आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. तरीही अजित पवार गटाकडून भुजबळांचे समाधान होईल असा कोणताही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे आता भुजबळांनी शरद पवारांचा आपल्याला आदर वाटतो असं म्हणणं आणि शरद पवारांसाठी सुप्रिया सुळेंकडे खास भेट पाठवणं यामुळे भुजबळ पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या अटकळींना जोर मिळाला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भुजबळांची अजित पवारांवर असलेली नाराजी आणि शरद पवारांबद्दलचा आदर यामुळे पक्षांतराच्या अटकळांना बळ मिळत आहे. मात्र, भुजबळांनी याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. मात्र, भुजबळांचा एकंदरीतच राजकीय प्रवास पाहाता ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. येत्या काळात भुजबळांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.