काल मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीत नाशिकमध्ये समता परिषदेची बैठक झाली.
बैठकीतील प्रमुख ठराव
१. जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव.
२. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय.
Chhagan Bhujbal News : देशात जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी सर्वप्रथम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आवाज उठविला. आंदोलने, मोर्चे काढण्यात आले निवेदने देण्यात आली. तसेच समीर भुजबळ हे खासदार म्हणून संसदेत काम करत असताना त्यांनी देशातील ओबीसी खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारकडे मागणी देखील केली होती.
आज आपल्या या लढ्याला मोठं यश मिळाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने भुजबळांनी आभार मानले.
नाशिकमधील आडगाव परिसरातील मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे समता परिषदेची बैठक रविवारी (दि. २३) पार पडली. बैठकीत जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, ॲड. राजेंद्र महाडोळे, सत्संग मुंडे, ॲड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडलिक आदी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० कलमात ओबीसी घटकासाठी तरतूद केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिला व बहुजन समाजाला शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजात विरोध पत्करून आयुष्यभर लढा दिला. महात्मा फुले यांनी जे कार्य केले. जे विचार मांडले ते कायद्यात मांडण्याचे काम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळ पुढे म्हणाले, आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तर वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे. आज आरक्षण मिळाल्यामुळे समाजातील वंचित घटकातील मुले शिक्षित होऊन आज मोठ्या पदावर पोहचली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरुषांचे विचार प्रत्येक जिल्ह्यात रुजविण्याचे काम समता सैनिकांनी करावे.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह समाज सुधारकांना आपल्या कार्यकाळात काम करत असताना अनेक कर्मठ लोकांनी विरोध केला त्रास दिला. त्या पद्धतीचे काही लोक आजही समाजात अजून समाजविघातक काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या विघातक शक्तींना आपण हाणून पाडले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.