
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये सध्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरु आहे. त्यात मंत्रिमंडळात लेट एन्ट्री घेतलेल्या छगन भुजबळांनीही उडी घेतली असून पालकमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून मंत्री गिरीश महाजन काम पाहत असताना आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळ्याचा आढावा घेतल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला.
स्थानिक मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी बैठक घेत कुंभमेळ्याचा आढावा घेतला. भुजबळ केवळ तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट कुंभमेळ्यातील क्लब टेंडरच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते कामाच्या 2270 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध करताना त्यात क्लब टेंडरींग झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करावी असे निर्देश मंत्री भुजबळांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले आहे.
कुंभमेळ्याची सगळी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार अशी करावी. ज्या कामांना दोन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे, अशी कामे टाळावी. याशिवाय कुठेही क्लब टेंडरीग होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना भुजबळांनी केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात लेट एन्ट्री घेतलेल्या भुजबळांनी गिअर बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बांधकाम विभागामार्फत सुमारे 2270 कोटींच्या रस्ते कामांसाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. एकूण 121 ठेकेदारांनी यात सहभाग घेतला असला तरी काही विशिष्ट ठेकेदारांना कामे मिळावीत यासाठी ‘रिंग’ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठेकेदार एका कामात पात्र ठरले, तर दुसऱ्या कामात त्यांनाच अपात्र ठरविण्यात आले. वार्षिक उलाढाल हजार कोटींच्या पुढे असलेल्या कंपन्यांना शंभर कोटींच्या कामात अपात्र ठरविण्यात आले, पण त्याच कंपन्या इतर समकक्ष कामांसाठी पात्र ठरल्या. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत रिंग करून कामे मिळविण्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे.
मंत्री भुजबळांनी या क्लब टेंडरींगची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून दरम्यान मल जलशुद्धीकरण केंद्रांच्या कामांच्या निविदांमधील कथित घोटासंदर्भातही भुजबळांनी पडताळणीचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.