Nashik News : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना येवला मतदार संघात पिछाडीवर जावे लागले. महायुतीचे प्रमुख मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदार संघ आहे.
तरीही महायुतीला येथे दणका बसल्याने तो राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय आहे. येवला मतदार संघात यंदाच्या निवडणुकीत कांदा निर्यात बंदी, मराठा आरक्षण, ओबीसींचा प्रश्न आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फुट हे प्रचाराचे मुद्दे होते. भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडणे मतदारांना पसंत पडले नसावे.
येवला विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या डॉ. पवार यांना 80 हजार 295 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे भास्कर भगरे यांना 93 हजार 500 मते होती. त्यामुळे डॉ. पवार 13 हजार 205 मतांनी मागे राहिल्या.
यामध्ये बाबू भगरे या राष्ट्रवादीच्या भगरे यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला 16 हजार 39 मते आहेत. ती एकत्र केल्यास भाजप येथे जवळपास तीस हजारांनी मागे राहिला. येवला विधानसभा मतदारसंघात ही स्थिती पहिल्यांदाच झालेली नाही.
छगन भुजबळ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात होते. तेव्हा लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार यांना 28 हजार 174 मतांची आघाडी होती. 2014 मध्ये येथे भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांना एक लाख दोन हजार नऊशे दोन मते मिळून त्यांनी 53 हजारांची आघाडी होती.
सलग तिसऱ्यांदा भुजबळ यांच्या उमेदवाराला येवल्यातील मतदारांनी नाकारले आहे. एकंदरच उमेदवार डॉ पवार यांच्या विषयी देखील मतदारांमध्ये व्यक्तिगत नाराजी आढळली. त्याचा एकत्रित परिणाम मंत्री भुजबळ यांचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले.
विधानसभा निवडणुकीला भुजबळ यांना सरासरी एक लाख मते मिळतात. ते आतापर्यंत 50 ते 55 हजारांच्या मताधिक्यांनी विजयी होत आले आहेत. मात्र लोकसभेला मतदार वेगळी भूमिका घेतात. त्यामुळे भुजबळ यांचे समर्थक भुजबळ वगळता अन्य उमेदवार असलेल्या निवडणुकीत मंत्री भुजबळ यांचे फारसे मनावर घेत नाहीत की काय, अशी स्थिती आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये देखील हा चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.