Jalna News: घनसांगवी (जालना) मतदार संघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चोथे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यांनी आज राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला आले. त्यामुळे राजेश टोपे यांच्याअडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
घनसांगवी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चोथे यांनी बंडखोरी केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला आहे.
त्याला विरोध म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाचे श्री चोथे यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न करूनही त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज श्री चौथे अचानक अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी नाशिकला दाखल झाले.
यावेळी त्यांनी श्री भुजबळ यांच्याशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली. श्री भुजबळ आणि आमचे गेली अनेक वर्ष संबंध आहेत. या संबंधांमुळेच मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अंतरवेली सराटी हे धनसांगवी मतदारसंघात आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील फॅक्टर आणि श्री चोथे यांची मंत्री छगन भुजबळ यांच्याशी झालेली भेट यांचा संबंध जोडला जात आहे. या संदर्भात श्री चोथे यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे.
श्री. चोथे म्हणाले, आम्ही अनवाणी पायी फिरून शिवसेना पक्षाला उभे केले आहे. त्याचा विस्तार केला आहे. पक्षाच्या वाढीसाठी परिश्रम घेतले आहेत. अशा स्थितीत हा मतदारसंघ पक्षाला मिळणे आवश्यक होते.
हा मतदारसंघा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाला नाही. आमच्या व कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले नाही. पक्षाची इमारत ढासळत असताना, मी गप्प कसा बसू? या भूमिकेतूनच माझे बंडखोरी आहे, असे श्री चोथे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेश टोपे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवित आहोत. तालुक्यात आम्ही श्री टोपे यांच्या राजकारणाला सतत विरोध करीत आलो आहोत. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नाराजी आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या आग्रहातूनच मी उमेदवारी करीत आहे, असा दावा श्री चौथे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.