Nashik Loksabha Election 2024: गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिक मतदारसंघ कोणाला याचा निर्णय महायुतीमध्ये होऊ शकलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडालेली आहे. आता या प्रश्नावरून नेत्यांचाही संयम सुटू लागला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आपला राग व्यक्त केला आहे.
नाशिक मतदारसंघ महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना हवा आहे. विशेषतः सातारा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला. त्यामुळे सातारा मतदारसंघाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनीही उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग केली आहे. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला होता. त्यांचा प्रचार सुरू झाल्यावर भाजपने या जागेवर दावा सांगितला. त्यांनी गोडसे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. मात्र, या सगळ्यातून गेले दोन आठवडे निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी महायुतीच्या नेत्यांना चांगलाच चिमटा घेतला. ते म्हणाले, नाशिक मतदारसंघाची जागा ज्यांना द्यायची असेल त्यांना द्यावी. मात्र एकदाचा गोंधळ संपवावा. याबाबतचा निर्णय किमान 20 मेपर्यंत झाला तर बरे होईल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात असल्याने 20 मे रोजी येथे मतदान होणार आहे. त्यामुळे कमी कालावधी शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांना निवडणूक तयारीसाठी झगडावे लागणार आहे. महाविकास आघाडीने नाशिक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ जागावाटप आणि उमेदवारी दोन्हीबाबत आग्रही असल्याचे समजते.
दरम्यान, आज रात्री महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. ठाणे, नाशिक, पालघर आणि सिंधुदुर्ग या चार मतदारसंघांचा तिढा सोडविण्यासाठी नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. या संदर्भात गुरुवारी महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत वाद असलेल्या मतदारसंघाचे वाटप आणि उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.