Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची उमेदवारी कधीही जाहीर होऊ शकते. दुसरीकडे या मतदारसंघावर दावा सांगणारे शिवसेनेचे पदाधिकारी मात्र नाराज आहेत.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी नाशिकच्या उमेदवारीचा आग्रह अद्याप सोडलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) मात्र याबाबत फारसे बोलण्यास तयार नाहीत. उमेदवारीसाठी गेलेल्या नाशिकच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नव्हती, त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्येच उमेदवारीचा तिढा कायम आहे. त्यात काय तोडगा काढायचा, यासाठी वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावे लागतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह खासदार हेमंत गोडसे मुंबईत आहेत. आज दुपारी मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट अपेक्षित आहे. या वेळी शिंदे गटाचा नाशिकच्या जागेसाठी आग्रह कायम असल्याने गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब व्हावे, असे प्रयत्न आहेत. त्यात कितपत यश येते, हे अनिश्चित आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी नैसर्गिक न्याय म्हणून नाशिकची जागा शिंदे गटाला मिळायला हवी. यामध्ये कोणताही अडथळा येईल, असे वाटत नाही. मुख्यमंत्री शिंदे यामधून मार्ग काढतील, असा आमचा विश्वास आहे असे सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाशिक आणि धाराशिव या दोन जागेंबाबत वाद होता. याबाबत तीनही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न होता. यामध्ये धाराशिवच्या जागेबाबत अद्याप मार्ग निघू शकलेला नाही. नाशिकच्या जागेबाबत आता समन्वय झाला आहे. यामध्ये संबंधित मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्यात आला आहे. त्यामुळे येथून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित आहे. आज सायंकाळी अथवा उद्या याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. या चर्चेमुळे शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीची भावना आहे.
दरम्यान, उमेदवारी नाकारल्याने खासदार हेमंत गोडसे यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांकडून निवडणूक लढविण्यासाठी दबाव आहे. त्यामुळे गोडसे बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास महायुतीला बंडाचे ग्रहण लागणार आहे. गोडसे यांनी बंडखोरी केल्यास त्याचा लाभ कोणाला आणि हानी कोणाला याचे कॅलक्युलेशन करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.