Loksabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी पुणे येथे बैठक झाली. मात्र, या बैठकीत खुद्द अजित पवार यांनीच उमेदवारीबाबत चर्चा करणे टाळले. त्यामुळे ही बैठक चर्चेचा विषय ठरला.
नाशिक मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उमेदवार असतील, असा संदेश राज्यभर पोहोचला आहे. त्यात बऱ्यापैकी तथ्य असल्याचंही बोललं जात आहे. कारण काही वरिष्ठ नेत्यांकडूनही त्याला दुजोरा मिळालेला आहे.
मात्र, या संदर्भात बुधवारी पुणे येथील लक्ष्मी लॉन्स येथे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत नाशिक आणि भुजबळ या दोन्ही विषयाचा साधा उल्लेखही उपमुख्यमंत्री पवार यांनी केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या कामाचे कौतुक सुरू केले. देशात विकास जोमात सुरू आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी यांचे सरकार निवडून आणले पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले. त्यावर नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी उभे राहून अहो दादा नाशिक मतदारसंघाचे काय? असा प्रश्न केला. या प्रश्नाने या बैठकीचा नूरच बदलून गेला.
अन्य पदाधिकाऱ्यांनीही या विषयावर चर्चेचा आग्रह धरला. तेव्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत अद्याप काहीच ठरलेले नाही. उद्या या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होईल. त्या बैठकीत मतदारसंघ कोणाला व उमेदवार कोण, याचा निर्णय आणि चर्चा होऊ शकेल. त्यामुळे आता ही चर्चा करण्यात काही साध्य होणार नाही असे स्पष्ट केले.
या वेळी व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांसह विविध नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना उमेदवारी देताना स्थानिक परिस्थितीचा विचार करून करावा. 2009 मध्ये आपला उमेदवार विजयी झाला होता, तेव्हाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात काही सामाजिक आंदोलने झाली आहेत. त्याचे पडसाद या निवडणुकीवर उमटू शकतात. त्यामुळे उमेदवार देताना विचारपूर्वक द्या, असे भुजबळ यांचे नाव घेण्याचे टाळून सांगण्यात आले. अन्य कार्यकर्त्यांनी फ्रेश चेहरा द्यावा, अशी मागणीही केली.
या वेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज हिरे, आमदार नितीन पवार, नरहरी झिरवाळ, निवृत्ती अरींगळे, अनिल चौगुले, विष्णुपंत म्हैसधूने, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे, अर्जुन टिळे आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.