Chhagan Bhujbal : छगन भुजबळ साहब आप कहना क्या चाहते हो! 38 वर्षांआधीचे फोटो व्हायरल..

Nashik Lok Sabha Explained नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे पराभवाच्या छायेखाली आले आहेत. त्याचवेळी छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचा उल्लेख असलेले फोटो ट्विट करून बेळगावमधील फोटो ट्विट केले आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Nashik Lok Sabha 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, राज्याचे मंत्री छगन भुजबळ लढणार, हे जवळपास निश्चित झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडून बसल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. शिंदे यांच्या ठाम भूमिकेमुळे नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे रिंगणात उतरले. मात्र ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्यावर निर्णायक आघाडी मिळवली. दुसरीकडे, हे टायमिंग साधत छगन भुजबळ यांनी 38 वर्षांपूर्वी सीमा भागात कानडी सक्तीच्या विरोधात वेश बदलून केलेल्या आंदोलानाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भुजबळ यांना कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून कानडी भाषेची सक्ती करण्यात आली होती. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादाचे तर अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. बेळगाव-कारवार सीमाप्रश्नही त्यावेळी पेटलेला होता. 4 जून 1986 रोजी भुजबळ वेशांतर करून बेळगावमध्ये घुसले होते. त्यावेळी या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. वेशांतर करून भुजबळ यांनी बेळगाव येथे आंदोलन केले होते. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी योगायोगाने 4 जून रोजीच होत आहे. 4 जून मुळे भुजबळ यांना त्या आंदोलनाची आठवण आली आणि त्यांनी ती आठवण छायाचित्रांसह ट्विटरवर पोस्ट केली.

बेळगावात घुसताना भुजबळ यांनी दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा केली होती. ही वेशभूषा इतकी परफेक्ट झाली होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांनीही आपल्याला लवकर ओळखले नव्हते, असे भुजबळ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. बेळगावात आंदोलन केल्यानंतर भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती. त्यावेळी भुजबळ शिवसेनेत होते. त्यांनी या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. त्यावेळी ते शिवसेनेत होते, त्यामुळे हा उल्लेख येणे साहजिक आहे. असे असले तरी राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी महत्वाच्या प्रसंगांत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती. मुंबईत होर्डिंग पडून दुर्घटना झाली, काही नागरिकांचा जीव गेला. यासाठी महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले, त्यांच्यावर टीका केली. यावेळी भुजबळ यांनी ठाकरे यांची बाजू घेतली. राज ठाकरे यांनी एका प्रचारसभेत, बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना काही वाटले नाही का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावेळी भुजबळ यांनी सडेतोड उत्तर देत राज ठाकरे यांची बोलती बंद केली होती. राज ठाकरे हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना का विचारत नाहीत, असेही ते म्हणाले होते. बाळासाहेबांच्या अटकेनंतर आपण सहकुटुंब मातेश्रीवर जाऊन भेट घेतली होती आणि त्यावेळीच तो विषय संपला होता, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते.

राजकीय नेते विनाकारण काही करत नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही अर्थ दडलेला असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आदेश असूनही नाशकिमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज होते. त्यामुळे महायुतीच्या गोटात चिंता पसरली होती. मतदानाच्या काही दिवस आधी महायुतीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती, त्यांची नाराज दूर केल्याचे सांगण्यात आले होते. आज मतमोजणी सुरू झाली आणि महायुतीला धक्का बसला. शिंदे गटाचे हेमंत गोडसे पिछाडीवर गेले. दुपारी तीनपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांच्यावर दीड लाखाचे मताधिक्य मिळवले होते. त्यानंतर भुजबळ यांच्या ट्विटची चर्चा सुरू झाली. भूजबळ यांनी हे ट्विट दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी केले होते. गोडसे त्या आधीच पिछाडीवर गेले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या ट्विटची चर्चा सुरू झाली. भुजबळ यांना नेमके काय म्हणायचे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Chhagan Bhujbal
Parbhani Lok Sabha Election Result 2024 Live: परभणीत 'मशाल' पेटली; जानकर यांच्या शिट्टीची हवा गुल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com