Eknath Shinde News : `शासन तुमच्या दारी` कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले. त्यासाठी टिका करताना दोघांनाही शरद पवार यांच्या `लोक माझे सांगाती` या पुस्तकाचा आधार घेतला. (Shivsena party suprimo UddhavThackerthe target of CM Eknath Shinde & Devendra Fadanvis)
राज्य शासनातर्फे आज नाशिकला शासन आपल्या दारी हा उपक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री दोघांच्याही टिकेचे लक्ष्य प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यासाठी दोघांनी शरद पवार यांच्या `लोक माझे सांगाती` या पुस्तकातील संदर्भांचा दाखला देत टिका केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या कार्यक्रमात दहा लाखांची नोंदणी झाली. त्यांना या उपक्रमाचा लाभ झाला. मात्र काही लोक म्हणतात, सरकार दारोदारी चालले आहे. मात्र त्यासाठीच हे सरकार स्थापन झाले आहे. मी एव्हढेच सांगतो, घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते. ती सत्ता लोकांच्या घरा घरात, दारा दारात जाऊन राबविण्यासाठी असते. ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असते. असं मानणाऱ्यांपैकी आम्ही कार्यकर्ते आहोत.
ते ठाकरे यांचा नामोल्लेख न करता म्हणाले, घरी जे बसतात, घरातून काम करतात, त्यांच्या बद्दल मी काही बोलू इच्छीत नाही. आदरनीय पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून टाकलेले आहे. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना सत्ता घरी बसवून टाकते. लोकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये येण्याची संधी देते.
हाच टिकेचा धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे मला कोणावर टिका करायची नाही, मात्र आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे वाक्य होते, मला अर्थसंकल्पातील फार कळत नाही. मला सहकारातले काहीच कळत नाही. मला शेतीतलं काहीच कळत नाही. शेवटी पवार साहेबांनी या ठिकाणी पुस्तक लिहिलं अन् त्यांनी सांगितलं, यांना राजकारणातलंही काहीच कळत नाही. आता असे नाही आहे. आम्हाला राजकारणतलंही कळतं. अर्थसंकल्पातलंही कळतं. सहकारातलंही कळतं, शेतीतलंही माहिती आहे. त्यामुळे काळजी करू नका, आता जे निर्णय होतील ते सामान्य माणसाच्या हिताचे होतील.
त्यामुळे एकंदरच शिंदे, फडणवीस यांच्या टिकेचे लक्ष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुस्तकाचा चपखल आधार घेतला.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, अनील पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहूल आहेर, राहूल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, मौलाना मुफ्ती, हिरामण खोसकर यांसह विविध आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.