Nagar News : नगर महापालिकाचे प्रशासक तथा आयुक्त डाॅ. पंकज जावळे थकीत मालमत्ता करवसुलीसाठी चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आलेत. थकीत करवसुलीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांनी महापालिकेचे चार प्रभाग अधिकारी आणि ६० वसुली कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा आदेश काढला आहे. तसेच कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. आयुक्त जावळे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.
मार्चअखेर असल्याने आणि थकीत देयके द्यायची असल्याने नगर महापालिका प्रशासन थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आग्रही आहे. यासाठी महापालिका आयुक्तांनी नगरमहापालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. थकीत करवसुलीसाठी या प्रभाग अधिकाऱ्यांबरोबर वारंवार बैठकादेखील झाल्या होत्या. यासाठी या अधिकाऱ्यांना तसा कर्मचाऱ्यांचा फौजफाटादेखील उपलब्ध करून देण्यात आला होता.
या चारही अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी ६० कर्मचारी नगरच्या मैदानात उतरवले होते, परंतु वसुलीच्या कामात सातत्य आढळले नाही. तसेच हलगर्जीपणा जास्त दिसल्याने आयुक्तांनी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. नगर शहरातील मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी २५० कोटी रुपयांवर आहे. वर्षभरात अवघी ५० कोटी रुपये वसुली झाली आहे.
वसुलीचे प्रमाण २० टक्के आहे. गेल्या दहा दिवसांत तीन कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ही वसुली वाढवण्यावर आयुक्तांचा भर होता. यानुसार महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मालमत्ता जप्तीचीदेखील कारवाई केली. यात ६८५ च्यावर नळजोड तोडले. तसेच ५५ मालमत्ता जप्त केल्या. महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महापालिकेलादेखील देणी आहेत. यात प्रामुख्याने महावितरण, मुळा पाटबंधारे विभाग, ठेकेदार बिलांसाठी तगादा करत आहेत. मुळा पाटबंधारे विभागाने नोटीस काढून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलाय. महावितरणदेखील वीजबिल थकत असल्याने पाणीपुरवठ्यावरील वीजपुरवठा खंडित करण्याच्या तयारीत आहेत. ही देणी भागवण्याचे दिव्य महापालिका प्रशासनासमोर आहे. यामुळेच आयुक्त डाॅ. पंकज जावळे हे थकीत करवसुलीसाठी आग्रही आहेत.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.