राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News: पारनेर-नगर मतदारसंघातील विविध गावांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नसून आमदार निलेश लंके यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्याकडे लक्ष वेधले.
अतिवृष्टीने बाधित वनकुटे गावाला हेलिकॉप्टरने येत एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. मात्र, मदतीची घोषणाबाजी करून वनकुटे गाव भरपाईपासून वंचित असल्याचे आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर लवकरात लवकर भरपाई देण्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लंके यांना दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात निलेश लंके यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पारनेर-नगर मतदारसंघाच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली. सोसाट्याचा वारा, गारपीटीसह झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, शासकीय योजनेतील घरकुलांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणत दि.११ एप्रिल रोजी मतदारसंघातील अतिवृष्टी बाधीत वनकुटे गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याची आठवण करून दिली.
ग्रामस्थ तसेच बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधताना घाबरून नका, आठ दिवसांत पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटूनही या अतिवृष्टीने संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना अद्यापही शासनाकडून एक रूपयाही मदत न मिळाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या मनात शासनाविषयी तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली असल्याचे आमदार लंके यांनी निवेदनात नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पारनेर-नगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आर्थिक मदत कशी उपलब्ध करता येईल, यासाठी सबंधितांना योग्य आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी आमदार लंके यांच्या समवेत माजी सरपंच अॅड.राहुल झावरे हेही उपस्थित होते.
Edited by - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.