इगतपुरी : मुंबई (Mumbai) महापालिकामध्ये काँग्रेस (Congress) नक्की सत्तेत येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी व्यक्त केला आहे. मात्र हे विधान त्यांनी ज्या काँग्रेस शिबिरात केला त्यात ५० लोकांची मर्यादा असताना दोनशे उपस्थिती होती. त्यात कोरोनाच्या निकषांना हारताळ फासण्यात आल्याने त्याची विशेष चर्चा आहे. याबाबत तहसीलदारांनीही नोटीस बजावल्याचे कळते, त्यामुळे काँग्रेसच्या या शिबिराला चांगलाच अपशकुन झालाय.
आज बलायदुरी (इगतपुरी) येथे काँग्रेस पक्षाचे प्रशिक्षण शिबिर झालेय त्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. त्यांनी सांगितले, की नागरिकांच्या समस्या हेरून त्या पद्धतीने काम केले पाहिजे, म्हणजे नक्कीच यश मिळते.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये मुंबईतील नगरसेवक, कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी तीनदिवसीय प्रशिक्षणवर्गाचे आयोजन शुक्रवारपासून करण्यात आले आहे. या प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना चव्हाण म्हणाले, की, मुंबई महापालिकेत काँग्रेस नक्कीच सत्तेत येईल, त्या दृष्टिकोनातून आमची व्यूहरचना सुरू आहे. असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, की मुंबईतील जनतेमध्ये काँग्रेस रुजली आहे. अनेक वर्षांची परंपरा काँग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेसला यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या या जाणून घेतल्या पाहिजे म्हणजे त्यातून विश्वास संपादन करता येतो आणि आपला विजयदेखील निश्चित करता येतो. त्या दृष्टिकोनातून कामकाज झाले पाहिजे. आज समस्या खूप आहेत; पण त्यातून मार्ग काढण्यासाठी मानसिक शक्ती कोणाचीही नाही, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला विजय संपादन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. शिबिराचे आयोजन काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी केले आहे. शिबिरात वस्त्रोद्योग व मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मुंबई व नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी हजेरी लावली. तीनदिवसीय चालणाऱ्या शिबिरात शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार आहे.
इगतपुरीत काँग्रेसच्या वतीने प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येत आहे. मात्र हे करत असताना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, या कार्यक्रमाला परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भाई जगताप यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे आढळून आले. त्याचबरोबर सध्या निर्बंध असताना कार्यक्रम कोणाच्या परवानगीने होतो आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसरीकडे स्थानिक तहसीलदार यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्याचा दावा केला आहे. तसेच कोविडच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी देखील काँग्रेसच्या कार्यक्रमाला नोटीस दिली आहे. त्यामुळे इगतपुरीतील काँग्रेचे प्रशिक्षण शिबिर अडचणीत आले आहे. या कार्यक्रमाला ५० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले, तर अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील नसल्याची परिस्थिती या वेळी होती. त्यामुळे कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन पाहायला मिळाले. तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात काँग्रेसचे दिग्गज नेते हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले, की रेनफॉरेस्ट रिसॉर्टची बुकिंग करण्यात आली असून, येथे ४०० पेक्षा अधिक रूम आहेत. त्यामुळे आम्ही फक्त ८५ रूममध्ये राहत आहोत. म्हणजे ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच हॉटेलच्या हालची कॅपॅसिटी ही ५०० नागरिकांची आहे. आम्ही फक्त १२५ नागरिक आहोत. त्यामुळे आम्ही कुठेही नियमाचे उल्लंघन केले नाही, असे सांगून या सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.