माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोमवारी (12 फेब्रुवारी) राजीनामा देऊन काल (13 फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील मोठे नेते खडबडून जागे झाले आहेत. त्या नेत्यांसमोरच काँग्रेसमधील आमदारांच्या तक्रारींचा स्फोट होण्याची शक्यता सांगितली जाते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याचे चित्र दिसले. या राजीनाम्यानंतर पक्षाचे अनेक नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ठ नेते चेन्नीथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यातील सर्व आमदारांची बैठक होत आहे. (Congress MLA Meeting)
यासंदर्भात काँग्रेसच्या आमदारांकडे कानोसा घेतला असता यातील बहुतांश आमदार प्रदेश अध्यक्ष पटोले तसेच अन्य नेत्यांबाबत नाराज असल्याचे दिसून आले. आमच्याशी दोन-तीन महिन्यांतून एकदाही कोणी संपर्क करत नाही. आमच्या काही अडचणी असल्यास स्वतः त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. पक्षातील वरिष्ठ नेते आणि आमदार यांच्यात कोणताही समन्वय राहिलेला नाही. आमदारांची पक्षावर निष्ठा आहे, म्हणून ते पक्षासोबतच आहेत. परंतु संघटना म्हणून पक्षांमध्ये प्रभावी नेता, समन्वय आणि तशी कुठलीही व्यवस्था राहिलेली नाही. अशी खंत या आमदारांनी व्यक्त केली.
आज होणाऱ्या बैठकीत संबंधित आमदार आपल्या भावना नेत्यांकडे मांडणार आहेत.एकंदरीतच भाजपकडून काँग्रेसचे आमदार संपर्कात आहे, अशा बातम्या पेरल्या जात होत्या. तरीही काँग्रेस पक्ष व त्याचे वरिष्ठ नेते निद्रिस्त आहेत. ही काळजीची बाब आहे. याबाबत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या देखील अनेक तक्रारी आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आणीबाणीच्या स्थितीत आणि लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर देखील काँग्रेस पक्ष गाफील आणि उदासीन असल्याचे चित्र आहे. हे चित्र पक्षासाठी वेगळे संकेत देखील ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी चव्हाणांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र वरिष्ठ नेतेच परस्परांत समन्वय नसल्याचे बोलून दाखवत असल्याने त्याचे पडसाद आमदार आणि प्रदेश संघटनेत उमटतात. काँग्रेस पक्षातील ही खदखद संपवण्यासाठी कोण पुढाकार घेणार आणि कोणत्या नेत्याचे वरिष्ठ पदाधिकारी ऐकणार, हा देखील चर्चेचा विषय आहे. पडसाद आजच्या बैठकीत उमटणार अशी माहिती काही आमदारांनी दिली.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.